अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: महिला राज्यकर अधिकारी लाचेच्या जाळ्यात

अहमदनगर- पाथर्डी तालुक्यातील मोहरी येथील व्यवसायिकाकडे पंचासमक्ष चार हजार रूपये लाचेची मागणी करणार्‍या वस्तू व सेवा कर विभागातील राज्यकर अधिकारी (वर्ग दोन) सारिका जयवंत निकम (वय 39) यांच्यावर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात लाचेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी ही कारवाई केली. पाथर्डी तालुक्यातील मोहरी येथील व्यवसायिकाने जीएसटी नंबर रिटर्न फाईल न केल्यामुळे जुलै, 2022 मध्ये रद्द करण्यात आला होता. तो पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी त्या व्यवसायिकाने राज्यकर अधिकारी निकम यांच्याकडे अर्ज दिला होता.

 

दरम्यान जीएसटी नंबर पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी निकम यांनी त्या व्यवसायिकाकडे पाच हजार रूपयांची मागणी केली असल्याची तक्रार त्याने लाचलुचपत विभागाकडे केली होती. लाचलुचपत विभागाने 17 नोव्हेंबर, 2022 रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता निकम यांनी तक्रारदार यांचा जीएसटी नंबर पुन्हा कार्यान्वित करून देण्यासाठी चार हजार रूपयांची लाच मागणी करून ती स्वीकारण्याचे मान्य केले होते.

 

त्यावरून बुधवार, 21 डिसेंबर रोजी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात सारिका निकम विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपअधीक्षक हरीष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद गोर्डे, पोलीस अंमलदार चौधरी, सचिन सुद्रुक, राधा खेमनर, संध्या म्हस्के, तागड यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button