अहमदनगर ब्रेकिंग : महिलेच्या डोक्याची कवटी सापडली !
नायरा पेट्रोल पंपामागे एका महिलेच्या डोक्याची कवटी सापडल्याने खळबळ उडाली आहे.

पाथर्डी तालुक्यातील तिसगाव शिवारात तिसगाव-पाथर्डी रोडवर नायरा पेट्रोल पंपामागे एका महिलेच्या डोक्याची कवटी सापडल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत पाथर्डी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
घटनेबाबत वाहिद अकबर पठाण (रा. बुधवार पेठ, तिसगाव) यांनी पाथर्डी पोलिसांना खबर दिली. रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास वाहीद हे त्यांच्या शेत गट नं. ६६० मधील शेतातील तुरीच्या पिकाची पाहणी करण्यासाठी शेतीच्या बांधावरून पायी चालत होते.
त्या वेळी पठाण यांना त्यांच्या शेतात अचानक पांढऱ्या रंगाची मानवी डोक्याची कवटी दिसली. कवटीजवळ काळे पांढरे रंगाचे केस, जोडवे, काचेच्या बांगड्या व पिवळ्या रंगाचे दोन मनी असलेली काळी पोत पडलेली दिसली.
तसेच कवटी जवळ एक सहावार रंगीबेरंगी साडी असल्याचे आढळून आले. त्यानंतर वाहिद पठाण यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात या प्रकाराची माहिती दिली.
पाथर्डी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर कायंदे यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. शेवगाव उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांनी ही घटनास्थळी तत्काळ भेट देऊन पाहणी केली.