अहमदनगर ब्रेकींग: लाच घेताना महिला व बालविकास कार्यालयातील अधिकार्याला पकडले

अहमदनगर- महिला व बालविकास अधिकारी कार्यालयातील जिल्हा परिविक्षा अधिकारी महेश अनंतराव पाटील याला तीन हजार रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरूवारी ही कारवाई केली.
नगर तालुक्यातील जेऊर बायजाबाई येथील तक्रारदार यांच्याविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात सन 2020 मध्ये हाणामारीचा गुन्हा दाखल झाला आहे. सदर गुन्ह्याची सुनावणी न्यायालयात सुरू आहे. न्यायालयाने तक्रारदार यांच्याविरूध्द आणखी काही गुन्हे दाखल आहेत काय याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिविक्षा अधिकारी पाटील यांना दिले होते.
त्याअनुषंगाने तक्रारदार यांच्याविरूध्द आणखी इतर गुन्हे दाखल नसलेबाबतचा अहवाल न्यायालयात पाठविणेकरिता पाटील यांनी तीन हजार रूपयाची मागणी केली असल्याची तक्रार तक्रारदार यांनी येथील लाचलुचपत विभागाकडे केली होती. लाचलुचपत विभागाने गुरूवारी लाच मागणी पडताळणी केली असता पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे तीन हजार रूपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार सर्जेपुरा येथील महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात तीन हजार रूपयांची लाच घेताना पाटील यांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.