अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या तरूणाला न्यायालयाने ठोठावली ‘ही’ शिक्षा

अहमदनगर- अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या तरूणाला जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एम. एच. मोरे यांनी दोषीधरून 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. नाना लक्ष्मण शिंदे (वय 35 रा. भिंगारदिवे मळा, सावेडी) असे शिक्षा झालेल्या तरूणाचे नाव आहे. सदर खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अ‍ॅड. मनिषा पी. केळगंद्रे-शिंदे यांनी पाहिले.

अहमदनगर शहरात राहणारी पीडित अल्पवयीन मुलगी शिवण क्लासला जाते म्हणून घरातून बाहेर पडली. परंतू संध्याकाळपर्यंत ती परत आली नाही म्हणून घरच्यांनी तिचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही. त्यानंतर फिर्यादी यांनी त्यांची पुतणीकडे विश्वासात घेवून चौकशी केली असता, तिने पीडित मुलगी नाना लक्ष्मण शिंदे याचेबरोबर प्रविण भावड्या वाकळे (रा. सावेडीगाव) याचे मदतीने निघून गेल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

फिर्याद दिल्यानंतर फिर्यादी तसेच त्यांचे भाऊ यांनी प्रविण वाकळे याचेकडे चौकशी केली असता, त्याने पीडित मुलगी व नाना शिंदे यांना शिराळचिचोंडी येथे सोडल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादी हा प्रविण वाकळे यास घेवून ज्या ठिकाणी पीडित मुलगी व नाना शिंदे यांना सोडले त्या ठिकाणी गेलेे. सदर ठिकाणाहून पीडित मुलगी व नाना शिंदे यांना फिर्यादी व त्याचे सोबत असलेल्यांनी ताब्यात घेवून तोफखाना पोलिसात आणले. पीडित मुलीकडे फिर्यादी व तोफखाना पोलिसांनी चौकशी केली असता, तिने सांगितले की,‘माझी व नाना शिंदे याची सुमारे एक महिन्यापूर्वी ओळख झाली. त्यानंतर तो मला माझे घरातील लोक घरी नसताना म्हणाला की, माझे तुझ्यावर प्रेम आहे, मला तु खुप आवडतेस. तसेच बोलण्यासाठी एक मोबाईल घेवून दिला व मी मोबाईलवर बोलत होते’, असे सांगितले.

12 मार्च, 2018 रोजी नाना शिंदे पीडित मुलीस फोनवर म्हणाला की,‘तु माझेबरोबर फिरायला येते का? तिने त्यावर होकार दिला. त्यांनतर दुसर्‍या दिवशी पीडित मुलगी व नाना शिंदे हे ठरल्याप्रमाणे चारचाकी वाहनातून गेले. सदरचे वाहन प्रविण वाकळे हा चालवित होता. शिंदे याने पीडित मुलीस पांढरीच्या पुलाकडे नेले. तेथील शेतातील एका घरामध्ये मुक्कामी राहिले व रात्रीचे वेळी अत्याचार केला. पीडित मुलीचा जबाब पोलिसांनी तिच्या सांगण्याप्रमाणे नोंदविल्यानंतर, सदर गुन्ह्यामध्ये भादंवि. कलम 376 (2) (जे), 366 तसेच लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण करणारा कायदा 2012 चे कलम 3 व 4 इत्यादी वाढीव कलम लावण्यात आले. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार जी. ए. केदार, पोलीस उपनिरीक्षक संजयकुमार सोने व सहायक पोलीस निरीक्षक आर. एन. पिंगळे यांनी करून न्यायालयामध्ये आरोपी विरूध्द दोषारोपत्र दाखल केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button