अहमदनगर

अहमदनगर ब्रेकींग: युवकाचा खून करून मृतदेह जाळला

अहमदनगर- शेंडी (ता. नगर) शिवारातील वांबोरी फाटा परिसरात रस्त्यालगत आतील बाजूस एका अंदाजे १८ ते २० वर्षे वयाच्या अनोळखी युवकाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

दरम्यान, या युवकाचा खून करून मृतदेह एका मोठ्या बॅगमध्ये भरून तो सदर ठिकाणी आणून टाकला व पुरावा नष्ट करण्यासाठी तो मृतदेह बॅगसह पेटवून दिला असल्याचे पोलिसांनी सांगितले. खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तो युवक कोण आणि त्याला कोणी मारून टाकले याबाबत तपास करण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे.

 

शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. सुमारे १८ ते २० वर्षे वय असलेल्या युवकाचा मृतदेह बॅगेसह जाळून टाकण्यात आल्याचे आढळून आले. खाजगी रुग्णवाहिकेतून हा मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.

 

या युवकाचा खून झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याने पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी औरंगाबाद येथे पाठवला होता. यानंतर रात्री उशिरा खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

दरम्यान, पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपअधीक्षक अनिल कातकाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनीही घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. मयताची ओळख अद्याप पटलेली नाही.

 

पोलिसांकडून ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. तपासासाठी पथकही रवाना करण्यात आले आहे. एलसीबी व एमआयडीसी पोलीस संयुक्तपणे तपास करत आहेत. या रस्त्यावरील सीसीटिव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असल्याचे अधीक्षक ओला यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button