अहमदनगर

अहमदनगर शहर सहकारी बँक अपहार; ‘त्या’ व्यवस्थापकाला अटक

नगर शहर सहकारी बँकेतील कर्ज प्रकरणात झालेल्या अपहारप्रकरणी बँकेचे सेवानिवृत्त व्यवस्थापक विजेंद्र वसंतराव माळवदे (रा. पाईपलाइन रोड, अहमदनगर) याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.

त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. या प्रकरणी उद्योजक बाबूलाल बच्छावत यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

उद्योगासाठी कर्ज मिळावे याकरता शहर सहकारी बँकेच्या झेंडीगेट येथील शाखेत बच्छावत यांनी 2019 साली अर्ज केला होता. सदर प्रकरण हे मंजूरीसाठी संचालक मंडळाच्या समोर गेले व त्या वेळी त्यांनी बच्छावत यांच्या कर्ज प्रकरणाला मंजुरी दिली होती.

बच्छावत यांनी दोन कोटी 78 लाख रुपयांचे कर्ज घेतलेले होते. सदरचे कर्ज मंजूर झाल्यानंतर त्यांना फक्त यातील काहीच पैसे त्यांच्या खात्यामध्ये गेल्याचे कळले व उर्वरित साधारणत दोन कोटी रुपयांची रक्कम ही दुसर्‍याच्या खात्यामध्ये परस्पर गेल्याचे आढळून आले.

कर्ज प्रकरणात अपहार झाल्याचे बच्छावत यांच्या लक्षात येताच त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. बँकेचे तत्कालीन संचालक मंडळ तसेच बँकेचे अधिकारी अशा एकूण 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यांना प्राथमिक तपासात अपहार झाल्याचे लक्षात आले. यामुळे बुधवारी बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक माळवदे यांना अटक केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button