अहमदनगर

अहमदनगर शहर सहकारी बँकेतील बनावट सोनेतारण घोटाळा; समोर आली ही धक्कादायक माहिती

अहमदनगर- शहर सहकारी बँकेतील बनावट सोनेतारण घोटाळ्या प्रकरणी बँकेचे व्यवस्थापक दिनेश कुलकर्णी यांनी कोतवाली पोलिसात फिर्याद दिली आहे. बँकेच्या पॅनेलवरील गोल्ड व्हॅल्युअर अजय किशोर कपाले (रा. बालिकाश्रम रोड), विशाल संजय चिपाडे (रा. चिपाडे मळा, सारसनगर), ज्ञानेश्‍वर रतन कुताळ (रा. चिपाडे मळा, सारसनगर) व सुनील ज्ञानेश्‍वर अळकुटे (रा. तपोवन रोड) यांना याप्रकरणी अटक करण्यात आली होती. आता श्रीतेज रमेश पानपाटील (रा. भिंगार) व संदीप सीताराम कदम (रा. नगर) या दोघांनाही पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

 

दरम्यान अटकेत आरोपींकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे. बेन्टेक्सच्या दागिन्यांवर हॉलमार्क शिक्का मारून ते खरे असल्याचे भासविले जात होते. सदरचे मशीनही कोतवाली पोलिसांनी केडगाव येथून जप्त केले आहे. दरम्यान या गुन्ह्यात अटकेतील आरोपींची संख्या सहावर पोहचली आहे. काही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांच्या पोलीस कोठडीत चार दिवसांनी वाढ करण्यात आली आहे.

 

त्यांच्याकडील तपासामधून इतर आणखी 18 ते 20 बनावट सोनेतारण खात्यांची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे फसवणुकीची रक्कम सुमारे एक कोटी 49 लाखांवर पोहचण्याची शक्यता आहे. या कर्ज खात्यांबाबतची माहिती पोलिसांनी बँकेकडून मागवली आहे. बँकेकडून अहवाल आल्यानंतरच फसवणुकीचा अधिकृत आकडा समोर येणार आहे. पोलिसांकडून सुरू असलेल्या तपासावेळी बनावट दागिन्यांवर हॉलमार्कचे शिक्के असल्याची माहिती समोर आल्याने पोलिसांनी आरोपीच्या घर व दुकानांची झडती घेतली.

 

केडगाव येथील लिंक रोडवरील एका गाळ्यातून पोलिसांनी बनावट दागिन्यांवर हॉलमार्कचा शिक्का मारणारी मशिनच ताब्यात घेतली आहे. तसेच काही बनावट दागिनेही पोलिसांनी हस्तगत केले आहेत. त्यामुळे पोलिसही चक्रावून गेले आहेत. मुळात ही मशिन आरोपींकडे आली कशी, त्यांना मशिन कुठून मिळाली, कोणी दिली, असे सवाल आता उपस्थित होत आहेत.

 

तसेच आरोपींनी इतरही बँकांमध्ये अशाप्रकारे फसवणुकीचे प्रकार केले असण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरू केला आहे. दरम्यान, आरोपींकडून बनावट दागिन्यांवर हॉलमार्कचे शिक्के मारून सदर दागिने फक्त बँकांमध्ये सोनेतारण कर्जासाठीच वापरले जात होते की, या दागिन्यांची खरे सोने म्हणून विक्रीही केली जात होती, अशा संशयही निर्माण झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button