Ahmednagar Crime : अहमदनगरमध्ये आयपीएल सट्टेबाजीवर नाशिक पथकाची कारवाई; ‘स्थानिक’ पोलीस अनभिज्ञ

शहरात सुरू असलेल्या आयपीएल सट्टेबाजीवर नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांच्या विशेष पथकाने शनिवारी रात्री छापा टाकून कारवाई केली.
या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक केली आहे. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) व अहमदनगर शहर पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने नाशिक पोलिसांकडून या सट्टेबाजीचा भंडाफोड झाला आहे.
यामुळे स्थानिक पोलिसांच्या कामगिरीवर आता प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहेत. विशेष पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक बापु रोहोम यांच्यासह अधिकारी, अंमलदारांनी बुरूडगाव रोडवरील चाणक्य चौफुलीजवळ ही कारवाई केली.
पथकातील पोलीस नाईक प्रमोद सोनु मंडलीक यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अभिषेक विठ्ठलराव देशमुख (वय 22 मुळ रा. कोरडगाव ता. पाथर्डी, सध्या रा. भोसले आखाडा, बुरूडगाव रोड, अहमदनगर), राहुल गवळी (रा. केडगाव) व स्वप्नील रामचंद्र परवते (रा. सारसनगर, अहमदनगर) यांच्याविरूध्द महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिषेक देशमुखला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 15 हजार 200 रूपये रोख रक्कम, एक दुचाकी व दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहे.