
श्रीगोंदा शहरातील तरुणाने खासगी फायनान्स कंपनीत जामिनदार म्हणून राहण्यासाठी दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करत श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनीत बोगस कर्ज तसेच जामिनदार करत एक कोटी ७३ लाख ६३ हजार ८९८ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात सागर साहेबराव लोखंडे यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा, माजी नगराध्यक्ष पती,
श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनीचे अधिकरी यांच्यासह सात जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील माजी नगराध्यक्षपती मच्छिद्र दत्तात्रय शिंदे रा. श्रीगोंदा यांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता,
न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. याबाबत पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार: शहरातील सागर साहेबराव लोखंडे,
या तरुणाकडून २०११ साली माजी नगराध्यक्षा सुनिता मच्छिंद्र शिंदे रा. श्रीगोंदा यांच्या पतीने पोकलॅण्ड मशीन घेण्यासाठी करावयाच्या कर्ज प्रकरणात जमिनदार राहण्यासाठी मतदान ओळखपत्र, फोटो, रेशनकार्ड व खासगी बँकेचा सही नमुना पडताळणी फॉर्म दिला होता. मात्र, याचा उपयोग नसल्याचे सांगत जमीनदार रद्द केल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र, त्या कागदपत्रांचा माजी नगराध्यक्षा सुनिता मच्छिंद शिदे रा. श्रीगोंदा मच्छिंद्र शिंदे, श्रीराम इक्रिमेंट फायनान्स कंपनीच्या तसेच श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी गैरवापर करत फिर्यादी यांना अंधारात ठेवत कर्ज प्रकरणात जमिनदार तसेच कर्जदार करत वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज घेत फिर्यादी यांची व्याज व दंडसहित एक कोटी ७३ लाख ६३ हजार ८९८ रुपयांची फसवणूक केली.
याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात माजी नगराध्यक्षा सुनिता मच्छिंद्र शिंदे, मच्छिंद्र शिंदे रा. श्रीगोंदा, श्रीराम इक्रिप्रमेंट फायनान्स कंपनी लि. अहमदनगरचे तत्कालीन कर्मचारी अभिषेक पालवे,
तत्कालीन शाखाधिकारी, श्रीराम ट्रान्सपोर्ट कापंनीचे श्रीगोंदा शाखाधिकारी सचिन दत्तात्रय पवार, कायदेशीर सल्लागार दिनेश विजय बिहाणी,
लवाद अधिकारी मुरलीधर दत्तात्रय पवार रा. अहमदनगर, या सात जणांवर कागदपत्रांच्या आधारे बोगस कर्ज तसेच जमिनदार करत फसवणूक केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.