अहमदनगर

अहमदनगर जिल्हा हादरला ! विवाहितेच्या आत्महत्येनंतर चोवीस तासांतच ‘त्याची’ निर्घृण हत्या…

संशय घेवून सतत दमदाटी, शिवीगाळ व मारहाण करण्याच्या प्रकाराला वैतागून डोळासणे येथील 31 वर्षीय विवाहितेने सोमवारी पहाटे आत्महत्या केली.

तत्पूर्वी त्या विवाहितेने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीवरुन डोळासणेसह जुन्नर तालुक्यातील दहा जणांवर गुन्हा दाखल झाला, त्यात मयतेच्या मित्राचाही समावेश होता.

मात्र धक्कादायक बाब म्हणजे सदर विवाहितेच्या चितेची अग्नी शांत होण्यापूर्वी त्याच स्मशानात तिच्या मित्राचाही अतिशय निर्घृण पद्धतीने खून करण्यात आला.

अवघ्या चोवीस तासांच्या कालावधीत घडलेल्या या दोन घटनांनी डोळासणेसह तालुक्याचा संपूर्ण पठारभाग हादरला आहे. सागर रघुनाथ क्षीरसागर असे खून झालेल्या मित्राचेे नाव असून घारगाव पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या धक्कादायक घटनेबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार डोळासणे येथील स्वाती शिवराम क्षीरसागर (वय 31) या विवाहितेने सोमवारी (14 मार्च) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली.

तत्पूर्वी संबंधीत विवाहितेने लिहिलेल्या चिठ्ठीत सागर रघुनाथ भालेराव, समीर रघुनाथ भालेराव, शैला उर्फ हौसा रघुनाथ भालेराव, नंदीनी समीर भालेराव (सर्व रा.डोळासणे), गिरीश थोरात (रा.कळंब, ता.जुन्नर), किसन गायतडके (रा.जुन्नर), मंगेश कर्डिले (नाव व पत्ता माहिती नाही.), रोहिदास उत्तर्डे व रंजना रोहिदास उत्तर्डे (दोघेही रा.आपटाळे, ता.जुन्नर) या दहा जणांनी वेळावेळी सतत तिच्यावर संशय घेवून मयत स्वाती क्षीरसागर यांना शिवीगाळ, मारहाण, दमदाटी केली. तसेच, फोन करुन मयतेचा पती, भाऊ, मुले व दीर यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने आपण आत्महत्या करीत असल्याचे लिहून ठेवले होते.

या घटनेनंतर मयतेने लिहून ठेवलेली चिठ्ठी तिचे पती शिवराम सीताराम क्षीरसागर यांच्या हाती लागल्याने त्यांनी याबाबत घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

त्यानुसार पोलिसांनी मयतेची उत्तरीय तपासणी केल्यानंतर तिचे पार्थिव नातेवाईकांच्या स्वाधीन करीत वरील दहा जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्यासह भारतीय दंडविधानच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात करीत याप्रकरणी मयतेच्या मित्राची आई शैला उर्फ हौसा रघुनाथ भालेराव व बहीण रंजना रोहिदास उत्तर्डे या दोघींना अटक केली. त्यानंतर डोळासणे येथील स्मशानात मयत विवाहितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

घटनेनंतर मंगळवारी सकाळी विवाहितेचा सावडण्याचा विधी होता. त्यासाठी तिच्या नातेवाईकांसह गावातील मंडळी स्मशानात गेली असता सदर विवाहितेवर अंत्यसंस्कार झालेल्या ओट्याजवळच सागर रघुनाथ भालेराव याचा मृतदेह आढळून आला.

हा प्रकार पाहून तेथे गेलेल्या नागरिकांची भंबेरीच उडाली. याबाबत घारगाव पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी फौजफाट्यासह तेथे धाव घेतली, काही वेळातच उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदनेही घटनास्थळी पोहोचले.

यावेळी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार स्मशानात खून झालेल्या अवस्थेत सापडलेल्या सागर भालेराव याचे व आत्महत्या केलेल्या स्वाती क्षीरसागर यांच्यात मैत्रीचे संबंध होते. त्यातूनच सागर भालेराव याच्या कुटुंबाकडून मयतेचा सतत शाब्दिक छळ सुरु होता.

त्यातून अनेकदा या कुटुंबांमध्ये भांडणेही झाली होती. या संबंधांना भालेराव कुटुंबाकडून होणारा विरोध सदर महिलेच्या आत्महत्येस कारणीभूत ठरला. मात्र तिचा अंत्यविधी होवून अवघ्या बारा तासांचा कालावधी उलटायच्या आतच त्याच ठिकाणी सागर भालेरावही मृतावस्थेतच आढळल्याने खळबळ उडाली .

सदर तरुणाचा अतिशय निर्घृण पद्धतीने खून करण्यात आला असून त्याला सुरुवातीला स्मशानातील लोखंडी अँगलवर आपटण्यात आले, त्यानंतर त्याला काठ्यांनी बेदम मारहाण करुन दगडाने मारुन त्याचे पाय मोडण्यात आले.

रात्रीच्या अंधारात आणि मयत विवाहितेच्या चितेच्या अग्नी उजेडात झालेल्या या बेदम मारहाणीत सागर भालेराव जागीच मयत झाला. त्यानंतर त्याला तेथेच सोडून त्याचे मारेकरी तेथून निघून गेले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button