अहमदनगर जिल्हा हादरला ! अनैतिक संबंधात अडथळा, पतीची हत्या करणाऱ्या पत्नीला अटक

श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वाडगाव येथे अनैतिक संबंधात अडसर ठरल्यामुळे पत्नीने पतीचा गळा दाबून खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
याप्रकरणी शहर पोलिसांनी सविता रमेश पवार (वय ४०) हिला अटक केली आहे. व्यवसायाने चालक असलेल्या रमेश पवार याचा ४ एप्रिल २०२३ मध्ये मृत्यू झाला होता.
पत्नी सविता हिने दिलेल्या माहितीवरून रमेश पवार हा मद्यपी होता. दारू पिल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे तिचे म्हणणे होते. रमेश पवार याच्या अंत्यविधीची तयारी करण्यात आली होती.
मात्र अज्ञात व्यक्तीने पोलिसांना माहिती दिल्यानंतर फौजफाटा तेथे दाखल झाला. पोलिसांनी शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर शवविच्छेदनामध्ये रमेश पवार याच्या गळ्यावर काही जखमा आढळून आल्या.
गळा दाबून खून झाल्याने शवविच्छेदन अहवालामध्ये स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची गती वाढवली. सविता पवार हिचे मोबाइल कॉल्स, काही महत्वाचे जबाब तसेच घटनाक्रमाची पोलिसांनी तपासणी केली.
त्यानुसार अनैतिक संबंधात अडसर ठरल्याने पत्नी सविता हिने पतीचा गळा दाबून खून केल्याचे पोलिस तपासात समोर आले. पोलिसांनी सविता हिला अटक करत न्यायालयासमोर उभे केले.
न्यायालयाने तिला ८ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या खुनामागे आणखी कोणी सहभागी असल्याबाबत पोलिस तपास करीत आहेत. पोलिसांनी शवविच्छेदनानंतर व्हिसेरा राखून ठेवला आहे.
पुणे येथे तपासणीसाठी तो पाठवण्यात आला आहे. त्याच्या अहवालावरून खुनाबाबत आणखी काही माहिती मिळेल, असे पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी सांगितले. सहायक पोलिस निरीक्षक समाधान सुरवडे हे तपास करीत आहेत.