अहमदनगर

अहमदनगर महापौर निवडणूक 2021 : आतापर्यंत काय झाल ? वाचा सविस्तर

अहमदनगर : शहरात महापौर पदाच्या निवडीचे वातावरण तापू लागले असून ३० जून रोजी विद्यमान महापौर बाबासाहेब वाकळे यांची मुदत संपत असल्याने नवीन महापौर निवडीच्या घडामोडींनी वेग घेतला आहे.

शिवसेनेने महापौर पद मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत, मात्र शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी नुकतीच पक्षश्रेष्ठींची भेट घेतली असून सर्व नगरसेवकांना विश्वासात न घेता उमेदवार ठरवला जात असल्याची सल शिवसेनेच्या काही नगरसेवकांमध्ये असून ते नगरसेवकही या आठवडयात पक्षश्रेष्ठींची भेट घेणार आहेत.

शिवसेनेकडून महापौर पदासाठी नगरसेविका रोहिणीताई शेंडगे यांची प्रबळ दावेदारी मानली जात आहे. नुकतीच काही पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींची भेट घेतली असून यावेळी आगामी महापौर निवडणूक व उमेदवारीबाबत चर्चा करण्यात आली.

मात्र शिवसेनेकडून या पदासाठी नगरसेविका रिता भाकरे याही इच्छुक असून त्यांच्यासह काही नगरसेवकांना विश्वासात न घेता पक्षश्रेष्ठींची भेट घेण्यात आल्याने नाराजी असल्याचे समजते. त्यामुळे भाकरे यांच्यासह काही नगरसेवक पक्षश्रेष्ठींची भेट घेण्याच्या तयारीत आहेत.

त्यामुळे शिवसेनेत दोन गट पडल्याचे चित्र आहे. सर्व नगरसेवकांना विश्वासात घेवून महापौर पदाचा उमेदवार निश्चीत करण्याची मागणी काही नगरसेवकांकडून केली जात असून शिवसेनेत शेंडगे व भाकरे यांच्यात महापौर पदासाठी रस्सीखेच पहावयास मिळत आहे.

शिवसेनेने जरी महापौर पदासाठी जोर लावला असला तरी राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या मदतीशिवाय सत्ता स्थापन करणे त्यांना शक्य नाही. राष्ट्रवादीने गेल्यावेळेस शिवसेनेला बाजूला सारत भाजपला महापौर व उपमहापौर पद मिळवून दिले होते.

सत्तेचा हा नगरी पॅटर्न राज्यभर गाजला. मात्र आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून शिवसेना, राष्ट्रवादी व कॉग्रेस महापौर पदाच्या निवडणूकीत एकत्र राहतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मात्र राष्ट्रवादीच्या भूमिकेवरच या पदावर कोण बसणार हे निश्चीत होणार असल्याने शिवसेनेला मोठी कसरत करावी लागणार आहे. शिवसेनेला आपल्या सर्व नगरसेवकांशी चर्चा करुन उमेदवार निश्चीत करावा लागणार असून त्यानंतर राष्ट्रवादी व कॉग्रेसशी चर्चा करून पुढील रणनिती आखावी लागणार आहे.

राष्ट्रवादी व भाजपच्या गोटात सध्या जरी शांततेचे वातावरण दिसत असले तरी ऐनवेळी दोन्ही पक्ष काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button