Ahmednagar News: लग्न समारंभात तलवारी घेवुन डान्स; 10 ते 15 जणांविरूध्द गुन्हा

लग्न समारंभात तलवारी घेवुन नाचल्याप्रकरणी कार्यक्रम आयोजकांसह 10 ते 15 जणांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस नाईक अब्दुलकादर इनामदार यांनी फिर्याद दिली आहे.
या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी स्वत: फिर्यादी होत हा गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये निसार जहागिरदार, फैजान जहागिरदार (दोघे रा. झेंडीगेट) व नाचणारे अनोळखी 10 ते 15 जणांचा समावेश आहे. 18 मे रोजी रात्री ही घटना घडली असून शनिवारी (दि. 21) रात्री गुन्हा दाखल झाला आहे.
निसार जहागिरदार यांच्या मुलाचे लग्न कार्यक्रमासाठी त्यांनी कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता 18 मे रोजी रात्री झेंडीगेट परिसरात विनापरवाना गैरकायद्याची मंडळी जमवून विनापरवाना ध्वनीक्षेपक लावले होते. त्यावेळी फैजान जहागिरदार व एक अनोळखी इसम त्यांच्या खांद्यावर काही इसमांना घेवुन नाचत होते.
खांद्यावर असलेल्या इसमांनी हातात तलवारी घेवून नाचत असताना सदर परिसरात दहशत निर्माण केली. यासदंर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. शनिवारी रात्री पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी पोलिसांना खात्री करून गुन्हा दाखल करण्याबाबत आदेश दिले होते. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे करीत आहेत.