Ahmednagar News : दोघांचा वाद, तिसर्यावर धारदार हत्याराने हल्ला

दोघांचे भांडण सोडविण्यासाठी तिसरा व्यक्ती गेला आणि त्याच्यावर धारदार हत्याराने हल्ला करण्यात आला. गणेश अंज्याबापू सातपुते (रा. केडगाव) असे हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक रोहिदास कोतकर व विशाल रोहिदास कोतकर (दोघे रा. केडगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघा सख्या भावांची नावे आहेत. दादा बापू घुले (वय 39 रा. विश्वयनराजेनगर, केडगाव) यांनी फिर्याद दिली आहे. रात्री नऊ वाजेच्यासुमारास केडगाव उपनगरातील विश्वयनराजेनगर येथे ही घटना घडली.
फिर्यादी दादा घुले यांनी गणेश सातपुते यांच्याकडून घर विकत घेतले आहे. घुले यांच्या पाठीमागे अशोक व विशाल हे दोघे भाऊ राहतात. अशोक यांच्या घराच्या पत्रावरील पाणी घुले यांच्या घरात येत होते. घुले यांनी अशोक यांना सांगितले असता त्यांनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
त्यावेळी घुले यांनी गणेश सातपुते यांना त्याठिकाणी बोलून घेतले. सातपुते तेथे आल्यानंतर त्यांनी कोतकर व घुले यांचे भांडण सोडविण्यासाठी मध्ये आले असता विशाल कोतकर याने त्याच्या हातातील धारदार हत्याराने गणेश यांच्या कपाळावर वार करून जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.