Ahmednagar News : कार कंटेनरची जोरदार धडक ! नगर दौंड रस्त्यावर भीषण अपघातात दोन ठार

नगर-दौंड महामार्गावर बाबुर्डी बेंद शिवारात सोमवारी (दि.२३) दुपारी झालेल्या दोन वाहनांच्या भीषण अपघातात दोनजण ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
अक्षय भरत डोमसे (वय ३०, रा. वाशी, नवी मुंबई) आयुष ऊर्फ वरद संतोष पवार (वय १८, रा. आयोध्यानगर, ता. श्रीगोंदा), अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.
नगर-दौंड महामार्गावर बाबुर्डी शिवारातील सोनाली मंगल कार्यालयासमोर श्रीगोंदावरून नगरकडे येणाऱ्या कारची व कंटेनरची सोमवारी दुपारी एकच्या सुमारास समोरासमोर धडक झाली.
अपघातात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला. अपघात झालेल्या कारमध्ये डॉ. संदीप आप्पासाहेब काळे यांच्यासह अक्षय डोमसे, आयूष पवार या नातेवाईकांसह नगरच्या दिशेने येत होते.
कंटेनर नगरहून श्रीगोंद्याच्या दिशेने जात होता दोन्ही वाहनांचा अपघात होताच मोठा आवाज नागरिकांसह झाल्याने परिसरातील वाटसरूंनी अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णालयात नेण्यास मदत केली.
रुग्णालयात जखमींना उपचारार्थ दाखल केले असता औषधोपचारापूर्वीच मृत झाल्याचे सांगण्यात आले. डॉ. संदीप काळे गंभीर जखमी असल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नगर-दौंड राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढली आहे. मात्र, रस्त्यावर दुभाजक नाहीत. त्यामुळे ओव्हरटेकच्या प्रयत्नात अनेकदा अपघात होतात, त्यात अनेकांचे जीव जात आहेत. अपघात सत्र थांबविण्यासाठी रस्ता चौपदरीकरणाची मागणी होत आहे.
आयुष पवार, अक्षय डोमसे दोघांवर सोमवारी रात्री वडाळीत (ता.श्रीगोंदा) रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. श्रीगोंदा तालुका सायकल असोसिएशनचे विश्वस्त डॉ. संजय काळे हे सोमवारी सकाळी सायकलवर श्रीगोंदा येथील साळवण देवीला गेले होते.
सकाळी अकराच्या सुमारास दोघांना घेऊन नगरकडे जात असताना हा अपघात झाला. त्यात डॉ. काळे गंभीर जखमी झाले. वरद व अक्षय या मावस भावांचा अपघातात मृत्यू झाला. वरद पवार हा मडकेवाडी येथील प्राथमिक शिक्षक संतोष पवार यांचा मुलगा तर भूषण डांगे यांचा भाचा होता. अक्षय डोमसे हा गोपाळराव डांगे यांचा भाचा होता.