Saturday, February 24, 2024
HomeअहमदनगरAhmednagar News : कळमकर काका, पुतण्यांनी भाजप समवेत जाण्याची भूमिका घेत पवारांचा...

Ahmednagar News : कळमकर काका, पुतण्यांनी भाजप समवेत जाण्याची भूमिका घेत पवारांचा विश्वासघात केला, शहर काँग्रेसचा घाणाघात

काँग्रेसने म्हटले आहे, याच जातीवादी भाजपने शरद पवारांची राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली. महाविकास आघाडीचे सरकार पाडले. राज्यात महायुतीत भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट यांची युती आहे. नुकतेच शिर्डीत शरद पवार, सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे वैचारिक शिबिर झाले. शिबिर होऊन चोवीस तास होत नाही तोच कळमकर यांनी ज्या अहमदनगर मधून राज्यात महायुतीच्या विरोधात आणि देशात इंडिया आघाडीच्या एकजुटीसाठी पवारांनी रणशिंग फुंकले त्याला विरोध करणारी भूमिका घेतली. हे पवारांशी व धर्मनिरपेक्ष विचारांशी विश्वासघात करणारे आहे.

Ahmednagar News : राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दादा कळमकर, शरद पवार राष्ट्रवादी गटाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर या काका, पुतण्यांनी जातीयवादी भाजप समवेत जाण्याची घेतलेली भूमिका धर्मनिरपेक्ष काँग्रेसला मान्य नाही. काँग्रेस पक्ष, शरद पवारांची राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आज महाराष्ट्रामध्ये भाजपसह महायुती विरोधात विचारांची लढाई लढत आहे. संघर्ष करत आहे.

महाराष्ट्राचा पुरोगामी विचार, शाहू, फुले, आंबेडकरांची विचारधारा जपत आहे. कळमकरांनी त्याला तिलांजली दिली. कळमकर यांनी आयुष्यभर शरद पवारांचा विश्वासघात केला. अभिषेक कळमकर यांनी सुद्धा पवार, सुप्रिया सुळे यांना फसवत काकांचाच कित्ता गिरवला. शहरात जातीयवादी भाजप समवेत जाण्याचा कळमकरांचा विचार हा नगर शहरासह महाराष्ट्रात राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेसचा नाही अशी स्पष्ट भूमिका शहर काँग्रेसने प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केली आहे.

ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, ओबीसी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक संजय झिंजे, अल्पसंख्यांक शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, काँग्रेस कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष विलास उबाळे यांनी संयुक्त प्रसिद्धी पत्रकारद्वारे कळमकर काका, पुतण्यांच्या भूमिकेचा जाहीर निषेध केला आहे. दादा कळमकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी केलेले राजकीय वक्तव्य प्रसार माध्यमांसह सोशल मीडियातून चांगलेच व्हायरल झाले होते. दादा कळमकर यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्या उपस्थितीमध्ये भाजपचे आजी-माजी शहराध्यक्ष, माजी जिल्हाध्यक्ष तसेच भाजपचे नगर शहर विधानसभा निवडणूक प्रमुख, शहर भाजप कार्यकारिणी, विविध मोर्चा, आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार करत कळमकर यांच्या निवासस्थानी राजकीय बैठक पार पडली होती.

यावेळी शहर भाजपच्या सत्काराला उत्तर देताना कळमकर म्हणाले होते, वरिष्ठ स्तरावर काहीही निर्णय झाला तरी नगरमध्ये पक्षीय मतभेद बाजूला ठेवण्याची आमची तयारी आहे. शहराचा आमदार, महानगरपालिकेचे सत्ताधारी एकच असतील तर शहराचा विकास होईल. नगरपालिकेच्या माध्यमातून भाजपला अनेकदा बरोबर घेतले. भाजपने मोठी साथ दिली. माजी भाजप शहराध्यक्ष वसंत लोढा म्हणाले, लता लोढा यांना भाजपच्या नगराध्यक्ष करण्यासाठी दादा कळमकर यांनी मदत केली होती. शहर काँग्रेसने यावर नाराजी व्यक्त केली आहे.

काँग्रेसने म्हटले आहे, याच जातीवादी भाजपने शरद पवारांची राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली. महाविकास आघाडीचे सरकार पाडले. राज्यात महायुतीत भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट यांची युती आहे. नुकतेच शिर्डीत शरद पवार, सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे वैचारिक शिबिर झाले. शिबिर होऊन चोवीस तास होत नाही तोच कळमकर यांनी ज्या अहमदनगर मधून राज्यात महायुतीच्या विरोधात आणि देशात इंडिया आघाडीच्या एकजुटीसाठी पवारांनी रणशिंग फुंकले त्याला विरोध करणारी भूमिका घेतली. हे पवारांशी व धर्मनिरपेक्ष विचारांशी विश्वासघात करणारे आहे.

यापूर्वी देखील २०१८ मध्ये शरद पवार यांनी दादा कळमकर, जगताप पिता, पुत्र यांना पुण्यामध्ये बोलावून घेत बजावले होते की कोणत्याही परिस्थितीमध्ये महानगरपालिकेत भाजप समवेत युती करायची नाही. त्यावेळी देखील कळमकर यांनी जगताप यांना साथ देत “अर्थ” पूर्ण कारणासाठी भाजप नेते शिवाजी कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचा महापौर राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने निवडून आणत पवारांना फसवले. एक मत शेवटी कमी पडत होते. त्या नगरसेवकाला कळमकर यांच्याच निवासस्थानी “अर्थ” पूर्णरित्या डील करत पाठिंबा देण्यासाठी तयार केले. भाजपला केलेल्या या मदतीचे आभार मानण्यासाठी भाजपचे मंत्री गिरीश महाजन, जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजी कर्डिले यांनी कळमकर यांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन जाहीर रित्या सत्कार केला होता. हे सबंध नगरला माहित असल्याची आठवण काँग्रेसने करून दिली आहे.

काँग्रेसने पुढे म्हटले आहे, कळमकर यांनी उभ आयुष्य कर्डिले, जगताप यांची राजकीय कारकीर्द फुलवीण्यासाठी घालवलं. त्यासाठी अनेक वेळेला “अर्थ”पूर्ण तडजोडी, राजकीय गद्दारी शरद पवारांना अंधारात ठेवून केल्या. रयत शिक्षण संस्थेत सुद्धा त्यांना पवारांनी संधी देऊन देखील त्याची साधी जाणीव सुद्धा कळमकर यांनी ठेवली नाही. काही वर्षांपूर्वी एक खूप मोठी चूक केली. त्यामुळे नगर शहर बदनाम झाले असे कळमकर म्हणतात. त्यांनी एक नाही आजवर पवारांना फसवत शेकडो चुका जाणतेपणाने राजकीय व आर्थिक स्वार्थासाठी केल्या आहेत. शरद पवारांना या वयामध्ये त्यांची फसवणूक करत यातना देण्याचे काम त्यांनी केले आहे. कळमकरांच्या जातीयवादी भाजप समवेतच्या भूमिकेमुळे शरद पवार, सुप्रिया सुळेंना महाराष्ट्रासह राष्ट्रीयस्तरावर पुन्हा एकदा खाली पाहण्याची वेळ काका, पुतण्यांनी आणली आहे. हे दुःख देणारे आहे.

जगतापांना केलेल्या राजकीय मदतीची परतफेड अभिषेक कळमकर यांना महापौर करून त्यांनी करून घेतली. कळमकर यांनी शहर बदनाम झाल्याचे म्हटले. होय, हे खरे आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर झालेल्या हल्ला प्रकरणात स्वतः कळमकर हे देखील आरोपी आहेत. या प्रकरणामुळे शहराची देशभर बदनामी झाली. त्या काळात अनेक महिने कळमकर यांना फरार रहावे लागले होते. ज्यावेळी अभिषेक कळमकर यांना राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांनी मारहाण केली त्यावेळी कळमकरांनी शेपूट घातले. त्यानंतर अभिषेक यांना स्व.अनिलभैय्या राठोड यांच्या दरबारी संरक्षणासाठी शरण जावे लागले. जे स्वतःचे संरक्षण करू शकत नाहीत, भाजप विचारां समवेत युती करतात ते शहरात पवार गटाच्या राष्ट्रवादीचे संघटन काय उभे करणार ? भाजप, शहर राष्ट्रवादीचे आमदार यांची राज्य पातळीवरून युती आहे. जी नूरा कुस्ती लोकसभेला विखे, जगताप यांनी खेळत मतदारांची फसवणूक केली तीच नूरा कुस्ती खेळण्याचा कळमकर यांचा विचार हा धर्मनिरपेक्ष मतदारांना, शरद पवार, सुप्रिया सुळे, महाविकास आघाडीला फसवणारा आहे याची गंभीर दखल महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते घेतील, असे काँग्रेसने पत्रकात म्हटले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments