Ahmednagar News : शिर्डीमधून उचलले, केडगावात सहा दिवस डांबले

गुंतवणूक करण्यासाठी दिलेल्या पैशांची मागणी करत नगरमधील टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स व्यावसायिकाचे आई-वडील आणि चुलत भावासह अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला. अजय बाळासाहेब जगताप (रा. भिस्तबाग चौक) असे अपहरण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
दरम्यान, अपहरण झालेल्या व्यावसायिकासह त्यांच्या आई व चुलत भावाची सुटका करण्यात तोफखाना पोलिसांना सोमवारी यश आले. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघांना दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
माधव ऊर्फ मनीष ठुबे (रा. केडगाव), आंतू वारुळे (रा. वारुळवाडी, ता. नगर), सीए दत्ता हजारे, दत्ता भगत, एक अनोळखी इसम असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत अजय बाळासाहेब जगताप यांनी फिर्याद दिली आहे.
अजय जगताप यांचा लिओ हॉलीडे टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. या माध्यमातून ते लोकांकडून पैसे घेऊन गुंतवणूक करतात. त्यांच्याकडे वरील आरोपी ठुबे याने तीन कोटींची गुंतवणूक केली होती.
त्याबदल्यात त्यांना जगताप यांनी व्याजाचा परतावाही दिला होता. त्यानंतर जुलै २०२३ मध्ये ठुबे याने पैशांची मागणी केली, त्यावर एक वर्षांचा करार झालेला आहे, आत्ता तुम्हाला पैसे देऊ शकत नाही, असे जगताप यांनी ठुबे याला सांगितले.
त्यानंतर ठुबे याने जगताप यांना धमकी दिली. १३ ऑक्टोबर रोजी अजय जगताप हे त्यांची आई जयश्री, वडील बाळासाहेब आणि चुलतभाऊ कृष्णा याच्यासह शिर्डीला गेले होते. ते त्या रात्री तिथेच एका हॉटेलमध्ये मुक्कामी थांबले होते.
दुसऱ्या दिवशी १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ठुबे हा अजय जगताप मुक्कामी असलेल्या हॉटेलवर आला. तिथे त्याने पैशांची मागणी करत जगताप यांच्यासह सर्वांना कारमध्ये बसवून केडगावला आणले. तिथे त्यांना एका बंद खोलीत कोंडून ठेवले. ते सहा दिवस त्याच खोलीत होते.
त्यानंतर त्यांना छत्रपती संभाजीनगर रोडवरील आनंद लान्सच्या पाठीमागील रूममध्ये नेण्यात आले. त्यावेळी जगताप यांनी सोने विकून ठुबे याला काही पैसे दिले. दरम्यान, ही माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत जगताप यांच्या आईची सुटका केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक नितीन रणदिवे करत आहेत.