अहमदनगर

Ahmednagar News:रिक्षा प्रवासात परप्रांतीयास लुटले; पोलिसांनी 24 तासात दोघांना गजाआड केले

 परप्रांतीय व्यक्तीला मारहाण करून लुटणार्‍या आकाश गोकुळ चव्हाण (वय 21 रा. केडगाव) व जितेंद्र रवींद्र क्षेत्रे (वय 30 रा. सुडके मळा, बालिकाश्रम रोड) यांना पोलिसांनी 24 तासात अटक केली.

एमआयडीसी पोलिसांनी ही कामगिरी केली. लुटमार झालेले नरेंद्र श्रीसंतोष विश्‍वकर्मा (वय 22 रा. सुहागपूर, मध्यप्रदेश) यांनी या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

19 मे रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास नरेंद्र विश्‍वकर्मा हे रिक्षाने पुणे बस स्थानक ते एमआयडीसी असा प्रवास करत असताना दोन इसमांनी त्यांना एमआयडीसी परिसरातील राहुल वाईन्सजवळ घेऊन जात लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण केली.

त्यांच्याकडील गॉगल, घड्याळ, रोख रक्कम, मोबाईल असा नऊ हजार 500 रूपयांचा मुद्देमाल काढून घेतला होता. सदरचा गुन्हा आकाश चव्हाण व जितेंद्र क्षेत्रे यांनी केल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांना मिळाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांच्या पथकाने आरोपींना सावेडी परिसरातून ताब्यात घेत अटक केली. आरोपींनी सदर गुन्ह्याची कबूली दिली असून चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) अजित पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, सहायक निरीक्षक आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक पाठक,

हंडाळ, पोलीस अंमलदार लोखंडे, नंदकिशोर सांगळे, चांगदेव आंधळे, साबीर शेख, महेश दाताळ, किशोर जाधव, सचिन हरदास, गिरवले, संदीप खेंगट, देशमुख यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button