अहमदनगर जिल्हा परिषदेच्या परीक्षेचे शुल्क मिळणार परत ! ‘अशी’ करा नोंदणी
जिल्हा परिषदेने यासाठी संकेतस्थळ जाहीर केले आहे. त्यावर उमेदवारांनी नोंदणी करायची आहे. जिल्हा परिषद गट-क मधील १८ संवर्गासाठी मार्च २०१९ मध्ये

अहमदनगर जिल्हा परिषदेच्या २०१९ व २०२१ मध्ये रद्द झालेल्या पदभरतीचे परीक्षा शुल्क परत देण्याची प्रक्रिया शासनाने सुरू केली असून,
जिल्हा परिषदेने यासाठी संकेतस्थळ जाहीर केले आहे. त्यावर उमेदवारांनी नोंदणी करायची आहे. जिल्हा परिषद गट-क मधील १८ संवर्गासाठी मार्च २०१९ मध्ये, तसेच आरोग्य विभागाच्या पाच संवर्गातील रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने ऑगस्ट २०२१ मध्ये जाहिरात प्रसिद्ध करून उमेदवारांकडून परीक्षा शुल्कही जमा करण्यात आले.
नगर जिल्ह्यातून या दोन्ही पदभरतीसाठी सुमारे १ लाखाच्या आसपास उमेदवारांनी अर्ज भरले होते. परंतु संपूर्ण भरती प्रक्रिया शासनाच्या २१ ऑक्टोबर २०२२ च्या शासन निर्णयाद्वारे रद्द करण्यात आली.
तेव्हापासून हे शुल्क शासनाकडेच जमा होते. उमेदवारांकडून वेळोवेळी या शुल्काची मागणी करण्यात आली. मात्र, शासनाकडून त्याला प्रतिसाद मिळत नव्हता.
मध्यंतरी काही रक्कम शासनाने जिल्हा परिषदांकडे वर्गही केली होती. परंतु ते कसे परत करायचे याबाबत नियमावली दिलेली नव्हती. शिवाय एकूण शुल्काच्या ६५ टक्केच ही रक्कम होती. त्या हिशोबाने नगर जिल्हा परिषदेकडे सुमारे दोन कोटी रुपये गेल्या काही महिन्यांपासून पडून होते.
दरम्यान, राज्यातील जिल्हा परिषद भरतीबरोबरच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (म्हाडा) अतिरिक्त शुल्क उमेदवारांना परत करण्याचा निर्णय शासनाने मागील आठवड्यात घेतला.
त्यानुसार आता हे शुल्क उमेदवारांना मिळणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेने उमेदवारांना आवाहन करून शासनाने दिलेल्या संकेतस्थळावर नोंदणी करण्यास सांगितले आहे.
अशी करावी लागणार नोंदणी
ज्या उमेदवारांना शुल्क परत मिळवायचे आहे, अशा उमेदवारांनी शासनाच्या https://maharddzp.com या संकेतस्थळावर जाऊन अर्ज क्रमांक देऊन नोंदणी करायची आहे. नोंदणी क्रमांक टाकल्यानंतर, तसेच इतर आवश्यक माहिती भरल्यानंतर उमेदवारांचे परीक्षा शुल्क त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.