दुचाकीसह दागिने चोरणाऱ्या चोरट्यास अकोले पोलिसांनी केले गजाआड

अकोले तालुक्यातील घोडसरवाडी येथून मोटारसायकल व सोन्याचे दागिने अशी एकूण 1 लाख 85 हजारांची चोरी करणार्या आरोपीस अकोले पोलिसांनी अटक केली. विशेष बाब म्हणजे या आरोपीस पोलिसांनी थेट ठाणे जिल्ह्यातील टिटवळा, ता. कल्याण येथून मुद्देमालासह अटक केली आहे.
या चोरीच्या घटनेबाबत मनोज सोपान घोडसरे (वय 18 वर्षे, रा. घोडसरवाडी ता अकोले) यांनी अकोले पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास करून आरोपीला गजाआड केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादीच्या राहते घरातून घोडसरवाडी समशेरपूर येथून आरोपी श्रावण किसन बरमाडे याने एकुण- 1,85,000 /- रु.कि. रोख रक्कम, सोन्याचे दागदागिने व एक मोटार सायकल असा मुद्देमाल चोरून नेला.
दाखल गुन्ह्यानुसार पोलिसांनी शोध सुरु केला. 16 एप्रिल रोजी टिटवळा ता. कल्याण, जिल्हा ठाणे येथे जाऊन आरोपीच्या ठावठिकाणाबाबत माहिती घेऊन सापळा लावून त्यास ताब्यात घेतले. श्रावण किसन बरमाडे (वय 38 वर्षे, रा. सिद्दी विनायक चाळ, कोलशेत रोड, आझादनगर, जि. ठाणे) असे त्याने त्याचे नाव सांगितले.
त्यानेच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून रोकड, दागीने व चोरलेली मोटार सायकल असा एकूण 1,85,000/- रु. कि. मुद्देमाल हस्तगत केला आहे.