विद्युत कंपनीच्या टॉवरमधून चोरली अॅल्युमिनिअमची तार; पोलिसांनी चोरणारा व घेणारा पकडला

अहमदनगर- इलेक्ट्रीक टॉवरची अॅल्युमिनिअम तार चोरी करणारा व विकत घेणारा अशा दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. श्रीकांत ऊर्फ शिरक्या फकिरा मनतोडे (वय 20 रा. आश्वी खु. ता. संगमनेर) व फारूख युसूफ सय्यद (वय 28 रा. जुने जोर्वे रोड, संगमनेर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून एक लाख तीन हजार 390 रूपये किंमतीची 490 किलो तार जप्त करण्यात आली आहे.
दरम्यान श्रीकांत मनतोडे याचे दोन साथीदार पोलिसांना सापडले नाही. शरद ऊर्फ गोट्या हरीभाऊ पर्वत (रा. दाढ ता. राहाता) व नरेंद्र ऊर्फ नर्या पंढरीनाथ इंगळे (रा. आश्वी ता. संगमनेर) अशी त्यांची नावे आहेत. 19 जुलै रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेशन कंपनीचे सुपरवायझर विभाष कुमार भोलाप्रसाद महतो (वय 50 रा. नारायणगाव ता. जुन्नर, जि. पुणे) हे सहकार्यांसह पारनेर तालुक्यात पेट्रोलिंग करत असताना वासुंदे जवळील टॉवरमधील दोन लाख रूपये किंमतीची दोन हजार 690 मीटर इलेक्ट्रीक तार अज्ञात इसमांनी चोरून नेली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पारनेर पोलिसांत फिर्याद दिली.
सदरचा गुन्हा हा श्रीकांत मनतोडे याने केला असुन तो राहते घरी आलेला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे, पोलीस अंमलदार बाळासाहेब मुळीक, मनोज गोसावी, देवेंद्र शेलार, सखाराम मोटे, शंकर चौधरी, विजय ठोंबरे, सुरेश माळी, सचिन आडबल, रवी सोनटक्के, रोहित येमुल, उमाकांत गावडे यांच्या पथकाने पहाटे चार वाजता मनतोडेच्या राहते घरी छापा टाकला असता तो मिळून आला. त्याचे दोन साथीदार पसार झाले. त्याने गुन्ह्याची कबूली देत तार फारूख सय्यद याला विकल्याची माहिती दिली. पोलिसांनी सय्यदला ताब्यात घेत त्याच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे.
दरम्यान तार चोरी करणार्या टोळीतील आरोपी मनतोडे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरूध्द आश्वी पोलीस ठाण्यात दरोडा तयारी, जबरी चोरी, चोरी असे गंभीर स्वरूपाचे चार गुन्हे दाखल असून त्याला 12 नाव्हेंबर, 2021 पासून 18 महिन्याकरीता अहमदनगर, पुणे व नाशिक जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. तर चोरीचा माल विकत घेणारा युसूफ सय्यद हा देखील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरूध्द संगमनेर शहर व आश्वी पोलीस ठाण्यात जबरी चोरी व चोरी असे गंभीर स्वरूपाचे पाच गुन्हे दाखल आहेत.