रुग्णवाहिकांमुळे ग्रामीण जनतेची सोय-तनपुरे

राज्य सरकारने १४व्या वित्त आयोगाच्या निधीतून जिल्ह्याला ४५ रुग्णवाहिका मिळाल्या. त्यात राहुरी तालुक्याला पाच रुग्णवाहिका मिळाल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण जनतेची सोय झाली असल्याचे प्रतिपादन ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले. राज्य सरकारकडून प्राप्त झालेल्या रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा राज्यमंत्री तनपुरे यांच्या हस्ते झाला.
यावेळी पंचायत समितीच्या सभापती बेबीताई सोडणार, उपसभापती प्रदीप पवार, गटनेते रवींद्र आढाव, जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष सुरेश निमसे, बाळासाहेब लटके, भाऊसाहेब लोंढे, माजी सभापती मनिषा ओहळ, गटविकास अधिकारी गोविंद खामकर, तालुका वैद्यकीय अधिकारी दिपाली गायकवाड, नगराध्यक्ष अनील कासार, उपनगराध्यक्ष सूर्यकांत भुजाडी उपस्थित होते.
मंत्री तनपुरे म्हणाले, महाराष्ट्रात रुग्णवाढीचा दर इतर राज्याच्या तुलनेत कमी आहे. परिस्थिती हाताळण्याचे चांगले काम राज्य सरकारकडून होत असल्याने यापुढे कोरोनाबाधित रूग्णांची दैनंदिन आकडेवारी कमी होईल. राज्यातील लॉकडाऊन एकदम उठणार नाही. टप्प्या टप्प्याने निर्बंध शिथील होतील, अशी माहिती त्यांनी दिली.
तालुका आरोग्य अधिकारी दीपाली गायकवाड, सुरेश निमसे, पंचायत समितीचे माजी उपसभापती रविंद्र आढाव यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अण्णासाहेब सोडनर, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, पंचायत समितीचे विभागप्रमुख उपस्थित होते. मंत्री तनपुरे यांच्या हस्ते राहुरी तालुक्यातील आरोग्य केंद्राच्या रूग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा झाला असला,
तरी दोन दिवसांपूर्वी उंबरे आरोग्य केंद्राच्या रूग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा झाल्याचा मुद्दा यावेळी पत्रकारांनी उपस्थित केला असता, ‘मी शासनाचा प्रतिनिधी असल्याने माझ्या हस्ते राहुरी तालुक्यातील रूग्णवाहिकांचे लोकार्पण होत आहे, काही लोकांना हौस असल्याने यापूर्वी लोकार्पण झाले असावे’, असा टोला मंत्री तनपुरे यांनी कुणाचेही नाव न घेता लगावला.