
सीमांचे रक्षण करण्याबरोबरच देशाचा गौरव अबाधित राखण्यासाठी लष्करी-निमलष्करी दलातील जवानांचे योगदान महत्त्वाचे आहे.
या जवानांच्या बाबत सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या संकल्पनेतील अमृत जवान सन्मान अभियान राज्यासाठीच नव्हे तर देशासाठी दिशादर्शक ठरेल,
असा विश्वास राज्याच्या आदर्श गाव योजनेचे प्रकल्प संचालक पद्मश्री पोपटराव पवार यांनी व्यक्त केला. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव लक्षात घेत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले
यांनी आजी-माजी जवानांच्या महसूल पोलीस ग्रामपंचायत आणि इतर प्रश्न मार्गी लावण्यासाठी ‘अमृत जवान सन्मान अभियान ‘हाती घेतले आहे.
ते आगामी दि.२३ एप्रिल पर्यंतच्या ७५ दिवसाच्या काळात जिल्ह्यात हे अभियान राबविले जाणार आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा स्तरावर तसेच तालुकास्तरावर समिती स्थापन करण्यात आली असून जवानांच्या मदतीसाठी कक्ष देखील गठीत करण्यात आले आहेत.
तसेच प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाच्या धर्तीवर जवानांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी जवान सन्मान दिवसाचे आयोजन देखील करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात अमृत जवान सन्मान अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पद्मश्री पोपटराव पवार बोलत होते.
पोपटराव पवार म्हणाले, आजी-माजी जवानांच्या प्रश्नांची तड लावण्यासाठी या अभियानाच्या माध्यमातून चांगली सुरुवात झाली आहे.
जिल्हाधिकारी भोसले यांच्या संकल्पनेतील हा उपक्रम नवी दिशा देणारा ठरणार आहे. प्रशासनाने प्रश्न सोडवण्यासाठी अभियानाच्या माध्यमातून एक पाऊल पुढे टाकले आहे.
नकारात्मकता बाजूला ठेवून पुढे आल्यास अभियानास गती मिळेल. समन्वयातून पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर प्रश्न मार्गी लागतील.
सैनिकांचे प्रश्न सैनिकांना एकत्र करीत सोडवण्याची नवीन चळवळ या अभियानाच्या माध्यमातून नगर जिल्ह्यातून उभी राहत आहे.
एक चांगला ट्रॅक यानिमित्ताने तयार झाला आहे. आजी-माजी सैनिकांनी एकत्र यावे. स्थानिक पातळीवर आजी-माजी सैनिकांचे संघटन झाले तर गावात बीट अंमलदाराची गरज पडणार नाही.
सैनिकांचे प्रश्न सोडवताना सैनिकांच्या एकजुटीतून विकासाच्या योजना देखील गतीमान होतील आणि गावाला न्याय देता येईल. यासाठी समस्या सोडवण्यापुरते अभियान मर्यादित राहू नये, असे आवाहन केले.