अहमदनगर

मुलीसोबत बोलताना हटकले म्हणून प्राध्यापकासह सिक्युरिटी गार्डला जीवे मारण्याचा प्रयत्न

अहमदनगर- कॉलेजच्या मुलीला बोलत असताना हटकले म्हणून प्राध्यापकासह सिक्युरिटी गार्डला मारहाण करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला. नेवासा येथील श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर ही घटना घडली.

 

मारहाणीत सुरक्षारक्षक गंभीर जखमी झाला असून याबाबत दाखल फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात जीवे मारण्याच्या प्रयत्नासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत प्रा. दशरथ हरिभाऊ आयनर (वय 56) रा. अहिल्यानगर नेवासा खुर्द यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, मी ज्ञानेश्वर महाविद्यालयात प्राध्यापक पदावर नोकरीस आहे. 16 नोव्हेंबर रोजी दुपारी पावणेचार वाजण्याच्या सुमारास मी व आमच्या कॉलेजवरील सिक्युरिटी गार्ड कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर 10 ते 15 फूट अंतरावर मुलांची गर्दी दिसल्याने तिथे गेलो. तिथे अनिल बबन माळी व अंकुश अशोक शिंदे असे दोघेजणसुद्धा होते.

 

त्यावेळी नेवासाफाटा ते नेवासा खुर्द जाणार्‍या रस्त्याच्या पलिकडे अंदाजे 20 ते 25 वर्षे वयाची पाच ते सहा मुले होती. त्यामध्ये आमच्या कॉलेजचा एक विद्यार्थी विशाल संजय साठे रा. मुकिंदपूर हा सुद्धा होता. ती मुले आमच्याजवळ आली. मुले सिक्युरिटी गार्ड पाराजी तागड यांना शिवीगाळ करू लागली. त्यामधील निखील नावाचा मुलगा तागड यांना म्हणाला की, लई माजलास कारे कॉलेजच्या मुलीला मी बोलत असताना तू का हटकले? तुझ्याकडे बघतोच अशा धमक्या देत असताना मी त्यांना समजावून सांगत असताना मुलांनी मलासुद्धा शिवीगाळ करून धक्काबुक्की करत माझ्या तोंडावर हाताने फटका मारून मला बाजूला ढकलले.

 

अनिल माळी व अंकुश शिंदे यांनासुद्धा शिवीगाळ करून त्यांनाही धक्काबुक्की करुन बाजूला ढकलून दिले. त्यानंतर सिक्युरिटी गार्ड पाराजी तागड यांची गचांडी धरून त्यांना मारहाण करु लागले. त्यावेळी एका मुलाने एका जाड बांबूने तागड यांच्या डोक्यात मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. बांबूने मारलेल्या फटक्यामुळे पाराजी तागड जागेवरच बेशुद्ध पडले. ते पून सर्व मुले तेथून पळून गेले.

 

त्यानंतर आमच्या महाविद्यालयातील तिघांनी पाराजी तागड यांना उपचारासाठी खासगी हॉस्पीटल व त्यानंतर नगर येथील खासगी हॉस्पीटलमध्ये दाखल केले. या फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाण्यात विशाल संजय साठे, निखिल (पूर्ण नाव माहित नाही) व त्यासह असलेले अन्य तीन ते चार तरुणांवर भारतीय दंड विधान कलम 307, 323, 143, 144, 147, 148, 149, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आहे. पुढील तपास पोलीस तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button