अहमदनगर

व्यसनासाठी पैसे न दिल्याचा राग; तरूणाची आईला मारहाण, भावावर चाकू हल्ला

तरूणाने स्वत: च्या आईला शिवीगाळ, मारहाण करून भावावर चाकूने वार केले. बुरूडगाव रोड परिसरात ही घटना घडली आहे.

व्यसन करण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून तरूणाने हे कृत्य केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऋषभ प्रकाश क्षेत्रे (रा. बुरूडगाव रोड, अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे. त्याचा जखमी भाऊ शुभम प्रकाश क्षेत्रे (वय 22 रा. बुरूडगाव रोड, अहमदनगर) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

गुरूवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान शुभम व त्याची आई घरामध्ये जेवण करत असताना ऋषभ हातामध्ये चाकू घेऊन त्या ठिकाणी आला. त्याने व्यसन करण्यासाठी पैसे मागितले असता त्यास नकार दिल्याचा राग आल्याने त्याने शिवीगाळ करण्यास सुरूवात केली.

आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी शुभम भांडण सोडवण्यासाठी गेले असता ऋषभने चाकुने त्याच्या पाठीवर व कमरेजवळ वार करून गंभीर जखमी केले आहे. पोलीस हवालदार सोनवणे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button