मित्राच्या मदतीने ट्रॅक्टरची विक्री अंगलट; शेतकर्याला चार लाखाला चुना

ट्रॅक्टर खरेदी-विक्रीच्या व्यवहारात शेतकरी प्रसाद चिंतामण हिंगे (वय 27 रा. खोडद गडाचीवाडी ता. जुन्नर, जि. पुणे) यांची चार लाख रूपयांची फसवणूक झाली आहे.
या प्रकरणी त्यांनी येथील कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून रामचंद्र ज्ञानदेव भांगीरे (रा. सोलणकरवाडी ता. माढा, जि. सोलापूर) याच्याविरूध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.
शेतकरी हिंगे यांनी त्यांचे मित्र विजय रावसाहेब कराळे (रा. कापुरवाडी ता. नगर) यांच्या ओळखीतून 13 जानेवारी, 2022 रोजी रामचंद्र भांगीरे याला पाच लाख 80 हजार रूपये किंमतीला कुबोटा ट्रॅक्टरची विक्री केली होती.
ठरल्या व्यवहारानुसार मार्केटयार्ड येथे भांगीरे याने हिंगे यांना एक लाख 80 हजार रूपये कराळे यांचे समक्ष दिले. उर्वरित रक्कम व कागदपत्रांवर दोन दिवसांत खरेदी करू, असे सांगून भांगीरे ट्रॅक्टर घेऊन गेला.
दोन दिवसांनी तो उर्वरित चार लाख रूपयांची रक्कम घेऊन आला नाही. हिंगे यांनी त्याच्याशी वेळोवेळी संपर्क केला असता त्याचा फोन बंद येत होता. त्याचा घरी जाऊन शोध घेतला असता तो घरी देखील मिळून आला नाही.
त्याने फसवणूक केली असल्याचे हिंगे यांच्या लक्षात येताच त्यांनी सोमवार, 4 एप्रिल, 2022 रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.