
अहमदनगर- गुहा (ता. राहुरी) गावामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामदैवत कानिफनाथांच्या धार्मिक स्थळावरून दोन समाजात वाद सुरू आहे. सदर प्रकरण हे न्यायालयात प्रलंबित आहे. याठिकाणी दर गुरुवारी ग्रामस्थ कानिफनाथांची आरती करतात.
दरम्यान काल गुरुवारी आरती करण्यासाठी ग्रामस्थांना प्रशासनाने मज्जाव केला. एवढेच नव्हेतर प्रशासनाने जमावबंदीही लागू केली. या प्रकाराने ग्रामस्थ संतप्त असून त्यांनी गावाच्या वेशीतच ठिय्या आंदोलन सुरू केले. तेथेच रस्त्यावरच आरती करून जोपर्यंत जमावबंदीचा आदेश प्रशासन हटवत नाही. तोपर्यंत आंदोलन चालूच राहील, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. आता यात प्रशासन कसा मार्ग काढते यावरच सर्वकाही अवलंबून आहे.
शेकडो नागरिकांनी एकत्रित येऊन कानिफनाथ मंदिर परिसरात आम्हाला आरती करु द्या, अशी मागणी केली. मात्र, पोलीस प्रशासनाने वादग्रस्त जागेत कलम 144 लागू असल्याने जमावाला एकत्रित येऊन आरती करता येणार नाही. दोन ते चार प्रतिनिधी आरती करू शकता. त्यास आमची त्यास हरकत नाही, असे उत्तर देताच संतप्त जमावाने विरोध करून आम्हा सर्व उपस्थित समाजाला आरती करण्याची परवानगी दिली तरच आरती करू, असा पावित्रा घेतला. त्यानंतर सदर जमाव नगर-मनमाड महामार्गालगत वेशीजवळ एकवटला. त्याच ठिकाणी कानिफनाथांची आरती केली.
दरम्यान गुहा येथील ग्रामस्थ कानिफनाथांची दर गुरूवारी आरती करतात. मागील महिन्यात दि. 21 जानेवारी रोजी शनि अमावस्येला कानिफनाथांच्या मंदिरात ग्रामस्थांनी आरती करून महाप्रसादाचे आयोजन केले होते. परंतु गावातीलच दुसर्या समाजाने होणार्या कार्यक्रमाला विरोध दर्शविला होता.
यानंतर श्रीरामपूरचे प्रांताधिकारी अनिल पवार, जिल्हा पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके, राहुरीचे तहसिलदार फसियोद्दिन शेख व पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे यांनी दोन्ही समाजाच्या लोकांची यावर तोडगा काढण्यासाठी राहुरी पोलीस ठाण्यात बैठक आयोजित करून न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवावी, दर गुरूवारी शांततेत आरती करावी, तर दुसर्या समाजाने त्याची नियमित धार्मिक पूजा करावी, गावात सामाजिक सलोखा राखावा, अशा अनेक बाबींवर दोन्ही समाजात एकमत झाल्याने हा तणाव निवळला होता. मात्र, काल आरती करण्यासाठी प्रशासनाने ग्रामस्थांना रोखून मंदिर परिसरात जमावबंदीचा कलम 144 चा आदेश दिल्याने हा वाद पुन्हा उफाळून आला.
आरतीनंतर ग्रामस्थांनी राहुरी येथे जाऊन प्रशासनाला निवेदन देऊन जर दि.9 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत जमावबंदीचा आदेश मागे घेतला नाही तर रास्तारोको व आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. यावेळी पोलीसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता.