
कोपरगाव तालुक्यातील कासली येथील महेश सोन्याबापू मलिक (वय ३२) याचे चेतन बापू आसने व केशव बापू आसने या अपहरण करून त्याचा कुऱ्हाडीने खून केला.
त्याचे प्रेत हरसूल, ता. त्र्यंबकच्या जंगलात फेकून दिले होते. मात्र कोपरगाव तालुका पोलिसांनी अवघ्या ४८ तासांच्या आत आरोपींना पकडून मृतदेह ताब्यात घेतला.
दोघा आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली, अशी माहिती पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दिली.
महेश मलिक व त्याचा ट्रॅक्टरचालक यांच्यात काही दिवसापूर्वी अनैतिक संबंधाच्या संशयावरून भांडण झाले होते. त्या घटनेनंतर ट्रॅक्टर चालक चेतन आसने हा नाशिककडे फरार झाला.
मात्र, तो गुरुवारी (१ जुलै) घरी आल्याची खबर मिळाल्याने महेश जाब विचारण्यासाठी पढेगाव येथे चेतनच्या घरी गेला. आरोपी चेतन बापू आसने व केशव बापू आसने यांनी त्याचे अपहरण करून त्याला पीकअपमधून घेऊन गेले होते.
कोपरगाव तालुका पोलिसांना दोघे आरोपी निफाड तालुक्यातील आपल्या नातेवाईकाकडे येणार असल्याची खबर मिळाली. त्यामुळे कोपरगाव पोलिसांनी दोन जुलै मध्यरात्रीच्या वेळेस चांदोरी टाकळी फाटा, ता. निफाड, जि. नाशिक येथे नातेवाईकाच्या घरासमोर सापळा लावला होता.
परंतु आरोपींना चाहुल लागल्याने ते वाहनासह पळून जात असताना पोलिसांनी मोठ्या धाडसाने त्यांच्यावर झडप घालून त्यांना पकडले त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी अपहरण केलेल्या महेश मलिक याचा कुऱ्हाडीचा घाव घालून खून केला.
त्याचा मृतदेह नाशिक मधील त्र्यंबक येथील जंगलात फेकून दिल्याची माहिती कोपरगाव पोलिसांना दिली. पोलिसांनी महेश मालिक यांचा मृतदेह मिळून आला. त्यानंतर या दोन्ही आरोपींना कोपरगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक दीपाली काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव, सहायक पोलिस निरीक्षक सुरेश आव्हाड, पोलिस हेडकॉन्स्टेबल इरफान शेख व पोलिस कॉन्स्टेबल जयदीप गवारे यांनी ही कारवाई केली.