डिजे वाजविण्यावरून वाद; तलवारीने हल्ला, पाच जखमी

नगर तालुक्यातील हिवरेझरे गावात डिजे वाजविण्यास विरोध केल्याच्या कारणातून एका कुटुंबातील पाच जणांवर तलवार व काठीने हल्ला करून पाच जणांना जखमी करण्यात आले.
गंगुबाई जयसिंग काळे (वय 60), गणेश जयसिंग काळे, माधव भानुदास काळे, भाऊसाहेब भानुदास काळे, कल्याण भगवंत काळे (सर्व रा. हिवरेझरे) अशी जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.
या प्रकरणी मंगळवारी रात्री नगर तालुका पोलीस ठाण्यात नऊ जणांविरूध्द मारहाण, शिवीगाळ, दमदाटी, आर्म अॅक्ट आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जखमी गंगुबाई काळे यांनी फिर्याद दिली आहे. आप्पासाहेब गंगाराम काळे, भाऊसाहेब गंगाराम काळे, ज्ञानेश्वर आप्पा काळे, तुषार भाऊसाहेब काळे, सचिन भाऊसाहेब काळे, जालिंदर गंगाराम काळे, नारायण गंगाराम काळे,
नवनाथ विलास काळे, राहुल ज्ञानदेव भापकर (सर्व रा. हिवरेझरे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. मंगळवारी सकाळी फिर्यादी गंगुबाई व त्यांचा पुतण्या भाऊसाहेब भानुदास काळे हे दोघे भाऊसाहेब गंगाराम काळे यांना म्हणाले की,
तुम्ही आमच्या वस्तीजवळ डिजे वाजवू नका, असे म्हणातच आरोपींनी तलवार, काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. भांडण सुरू असताना
फिर्यादी यांच्या गळ्यातील गंठण व बोरमाळ तुटून गहाळ झाली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास सहायक फौजदार बी. वाय. लबडे करीत आहेत.