अहमदनगर ब्रेकिंग : हॉटेलमध्ये सुरु होता वेश्याव्यवसाय पोलिसांना समजताच…

केडगाव बायपास रोडवरील हॉटेल राधेश्याम या ठिकाणी सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर कोतवाली पोलिसांनी छापा टाकला आहे.
हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय चालविणाऱ्यांसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
पीडित तरुणी पश्चिम बंगाल राज्यातील असून तिची सुटका करण्यात आली असल्याची माहिती पोनि. चंद्रशेखर यादव यांनी दिली. केडगाव बायपास रोडवरील हॉटेल राधेश्याम येथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती गुप्त बातमीदारमार्फत श्री. यादव यांना मिळाली होती.
पोलीस निरीक्षक यादव आणि कोतवाली पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील कर्मचारी तत्काळ कारवाई करण्यासाठी पंचासह रवाना झाले.
हॉटेल राधेश्याम येथे बनावट ग्राहक पाठवून त्यानंतर छापा टाकला असता हॉटेलच्या तळघरातील एका खोलीत वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे उघड झाले.
त्या ठिकाणी हजर असलेल्या दोघांना नावे विचारली असता आकाश सुभाष गायकवाड (वय २४ वर्षे, रा. सावेडी, नगर), शहानवाज वहाब हुसेन (वय २१ वर्षे, रा. तपोवन, नगर) असे सांगितले.
तसेच हॉटेल मालक सुरज (पुर्ण नाव माहित नाही) याच्या सांगण्यावरून ग्राहकांकडुन पैसे घेवून त्यांना रुम उपलब्ध करुन देऊन महिलेकडुन वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याची कबुली दिली.
या कारवाईत ३३ हजार २३० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस हवालदार गणेश धोत्रे यांच्या फिर्यादीवरुन अनैतिक व्यापारास प्रतिबंध सन १९५९ चे कलम ३,४,५,७,८ प्रमाणे गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव करीत आहेत.