भाचे जावायाचा मामी सासर्यावर हल्ला; कारण…

भाचीला नांदवायला पाठवित नसणार्या मामी सासर्याला जावायाने शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. रस्त्यावर ढकलून दिल्याने डोके फुटून ते जखमी झाली आहे.
बाबासाहेब राजाराम भिंगारदिवे (वय 44 रा. बालाजीनगर, बोल्हेगाव) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. गुरूवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास बालाजीनगरमध्ये ही घटना घडली.
या प्रकरणी जखमी भिंगारदिवे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणारा भाचे जावई राहुल चंद्रकांत जाधव (रा. बालाजीनगर, बोल्हेगाव) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिंगारदिवे हे त्यांच्या घरी असताना जाधव हा तेथे आला. ‘तुम्ही माझ्या बायकोला नांदवायला का पाठवत नाही’, असे बोलून त्याने भिंगारदिवे यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
रस्त्यावर ढकलून दिल्याने भिंगारदिवे यांचे डोके फुटले आहे. त्यांनी जिल्हा रूग्णालयात उपचार घेवून तोफखाना पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी जाधव विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार संतोष गर्जे करीत आहेत.