अहमदनगर

अहमदनगर मधील त्या पत्रकारांनाही पुरस्कार द्या ! अन्यथा जाहीर निषेध आंदोलन करणार

अहमदनगर येथील शहर सुधार समिती व समविचारी पक्ष संघटनांच्या शिष्टमंडळाने आज रोजी मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांची भेट घेऊन शहरातील पत्रकारांवरील अन्याय दूर करत इतर प्रवाहातील पत्रकारांनाही पुरस्कार देण्यात यावेत त्यासाठी तात्काळ बैठक घेऊन पुरस्कार जाहीर करावेत व दि. ६ रोजी ते वितरण करावेत, अशी मागणी केली.

यावेळी आयुक्तांना मागणीपत्र दिले. शिष्टमंडळात अहमदनगर हॉकर्स संघटनाध्यक्ष तथा माजी नगरसेवक संजय झिंजे, सुनिल नागपुरे, ऊर्जिता सोशल फौंडेशनच्या संध्या मेढे, युनूस तांबटकर, ऑल इंडिया युथ फेडरेशनचे फिरोज शेख, दिपक शिरसाठ, आम आदमी पक्षाचे रवि सातपुते, राजेंद्र कर्डीले, अरूण थिटे आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शहर सचिव भैरवनाथ वाकळे यांचा समावेश होता.

या मागणीवर सकारात्मक कार्यवाही करावी व शहरातील पत्रकारांवरील अन्याय दूर करावा अशी आग्रही मागणी शिष्टमंडळाने यावेळी केली. मागणीपत्रात सविस्तर लिहण्यात आले होते की, ६ जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या वतीने पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत. पुरस्काराचे व पुरस्काराप्राप्त पत्रकार भावांचे आमच्याकडून हार्दिक अभिनंदन. यानिमित्ताने मनपा व राजकिय पुढारी कसे ‘आभाळाएवढ्या मोठ्या विषयाला तिळाच्या दाण्याएवढे लहान करतात’ हे दिसून आले.

यानिमित्ताने महानगरपालिका व रिमोट कंट्रोलने वैभवशाली अहमदनगरच्या पत्रकारीतेच्या वारशाकडे अक्षरश: दूर्लक्ष केलेले दिसत आहे. अहमदनगरच्या पत्रकारीतेचा वारसा ऐतिहासिक आहे. मोगलकाळात इसवी सन १६८५ च्या पुर्वीपासून येथे बातमीपत्र लिहले जात होते. त्यावर जगप्रसिध्द इतिहासकार सेतुमाधवराव पगडी यांनी ‘मोगल दरबारची बातमीपत्रे’ या ग्रंथाचे काही खंड अनुवादीत करून संपादित केलेले आहेत. त्यानंतर इंग्रजी राजवटीत ज्ञानोदय हे नियतकालिक प्रसिध्द होत होते. यामधे महात्मा फुलेंचे समाजपरिवर्तनाचे साहित्य नेहमी प्रसिध्द केले जात.

त्याप्रमाणे मुक्ता साळवे यांचा जगप्रसिध्द निबंध याच ज्ञानोदयमधे प्रसिध्द केलेला होता. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही अहमदनगरच्या प्रश्नांवर पत्रकारीता केलेली आहे. शहरातील प्रश्न त्यांनी आपल्या बहिष्कृत भारत व मुकनायक मधे प्रसिद्ध केलेले आहेत. अहमदनगरमधून सलग ५७ वर्षे प्रकाशिक होणारे सत्यशोधक मुकुंदराव पाटील ‘दीनमित्र’ याचीही दखल सामाजिक परिवर्तनच्या इतिहासात घेतली जाते. स्वातंत्र्य चळवळीच्या काळातही अनेक पत्रकार, संपादक होऊन गेलेले आहेत. यासर्वांच्या ऐतिहासिक कार्याकडे आपण दूर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. कै. जनुभाऊ काणे आणि कुटुंबियांच्या पुर्वमालकीचे समाचार या वृत्तपत्राचे आताचे संपादक मालक महेन्द्र कुलकर्णी यांचे नुकतेच निधन झाले.

त्यांच्या निधनाने जिल्ह्यातील पुरोगामी चळवळीसह सामाजिक व राजकीय क्षेत्रातील लोकांनी हळहळ व्यक्त केली. त्यांनी पत्रकारीता करताना सर्वांना समान न्याय दिला. त्यांच्या निधनाबद्दल महानगरपालिकेने या क्षेत्रातील दोन पत्रकार बांधवांना पुरस्कार देणार असल्याचे जाहीर केले. दोन सिनिअर पत्रकारांच्या नावाची घोषणा केली. तशा प्रेसनोटही प्रसिद्धीस पाठविल्या. पहिला जीवनगौरव पुरस्कार भुषण देशमुख व उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्कार ‘लोकसत्ता’चे मोहिनीराज लहाडे यांना जाहीर करण्यात आला. या दोघांचेही पत्रकारीता क्षेत्रात महत्वाचे योगदान आहे.

इतिहास संकलन समितीच्या क्षेत्रात देशमुख यांचे तर राजकीय, सामाजिक पत्रकारितेत लहाडे यांचे महत्वाचे काम आहे. दोघाही पत्रकार बांधवांचे आमच्याकडून हार्दीक अभिनंदन. अपुर्ण पुरस्काराच्या उद्योगामुळे सामाजिक, राजकीय तसेच पत्रकार बांधवांमधेही दबक्या चर्चा सुरू झाल्या की या पुरस्कारामुळे महानगरपालिकेने रिमोट कंट्रोलच्या नादी लागून आभाळाएवढ्या असणाऱ्या पत्रकारिता क्षेत्राला मोठे केले की तिळाच्या दाण्याएवढे छोटे केले? राजकीय दृष्टीकोन पुढे ठेवून एक विशिष्ट विचारधारा असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेला व समाजाला खूश करण्यासाठी तर हा उद्योग केला गेला नाही ना ? अहमदनगरमधील पत्रकारीतेला फार मोठा वारसा असताना महानगरपालिकेने असे ‘क्षुल्लकबुध्दी’ काम का केले असावे? कोणाच्या आदेशावरून केले असावे ? उद्देश काय ? पत्रकारितेत अनेक क्षेत्र येत असताना डिजीटल मिडीया, इलेक्ट्रॉनिक मिडीया, आकाशवाणी पत्रकार, उर्दू पत्रकारीता, सत्यशोधक पत्रकारीता या पत्रकार बांधवांवर अन्याय का केला असावा? असे अनेक प्रश्न यामुळे निर्माण झालेले आहेत. अहमदनगरमधील पत्रकारीतेला मोठा वारसा असताना महानगरपालिकेने या वारश्याकडे राजकीय पुनर्वसनापायी अक्षरशः दूर्लक्ष केलेले दिसून येत आहे.

हे अत्यंत निषेधार्ह, अन्यायकारक आहे. अहमदनगरच्या पत्रकारीेतेचा इतिहास यासाठी आपणास माहिती पाहिजे. महाराष्ट्राच्या धार्मिक व सामाजिक प्रबोधन चळवळीतील ‘ज्ञानोदय’ हे एक महत्वाचे व आजतागायत टिकून असलेले नियतकालिक आहे. अमेरिकन मराठी मिशनने अहमदनगरहून जून १८८२ साली ते सुरू केले होते. हिंदूधर्मशास्र व ख्रिस्तीधर्मशास्त्र याविषयी समाजात असलेले कित्येक गैरसमज दूर करण्यास समर्थ ठरेल, असे एखादे नियतकालिक सुरू करणे आवश्यक आहे या हेतूने ते सुरू केलेले होते. या वर्तमानपत्राचे संपादक मोठमोठी विद्वान मंडळी होती ज्यांचा जगात नावलौकिक होता. त्यात १८४२ चे पहिले संपादक हेन्री बॅलन्टाईन, ह्यूम, रेव्ह. सॅम्युअल बेकन फेअरबँक, हेजन, शाहू दाजी कुकडे, पार्क, ॲबट, तुकाराम नाथोजी सुमंत विष्णू करमरकर, कवी ना. वा. टिळक, अहमदनगर महाविद्यालयाचे संस्थापक भा. पां. हिवाळे हे १९५१ पर्यंत होते. या वृत्तपत्राने शिक्षण, आरोग्य, शेतीसह महात्मा जोतीराव फुले यांच्या चळवळीला मोठा हातभार लावला होता.

त्यांचे साहित्य यात नियमित प्रसिध्द होत होते. महाराष्ट्र व देशाच्या जडणघडणीत या अहमदनगरमधून प्रसिध्द होणाऱ्या ‘ज्ञानोदय’ चा मोठा सहभाग आहे, वाटा आहे. अहमदनगर सत्यशोधक पत्रकारीतेचे केंद्र होते. फुलेंची चळवळ या पत्रकारीतेने पुढे नेली होती. महात्मा फुलेंचे सहकारी कृष्णराव भालेकर यांचे भाचे गणपतराव सखाराम पाटील यांनी अहमदनगरमधे ‘तुकाराम’ नावाचे वृत्तपत्र सुरू केले होते. त्यांच्या निधनानंतर ते त्यांचे चिरंजीव मुकुंदराव पाटील यांनी ५७ वर्षे ‘दीनमित्र’ हे वृत्तपत्र चालविले. त्यास राजर्षी शाहू महाराज सहकार्य करत असत तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरही सोबत असत. येथील पत्रकारीतेच्या वारसा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेही समृध्द झालेला आहे. येथील अनेक सामाजिक परिवर्तनाच्या घटना आंबेडकरांनी माळीवाडा, भिंगार, सावेडी येथे प्रत्यक्ष भेट देवून आपल्या बहिष्कृत भारत व मुकनायक या वृत्तपत्रात प्रसिद्ध केलेल्या आहेत.

उदा. १८५९ साली घडलेले नवीपेठ, चौपाटी कारंजा व बारातोटी कारंजा आदी भागातील ‘नगर येथील पाणीप्रकरण’ या व्यतिरिक्त शहरात अनेक वृत्तपत्र प्रकाशिक होत होती. त्यांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यात मोठा सहभाग होता. त्यामधे अहमदनगरचे भाग्यविधाते नवनीतभाई बार्शीकर यांचा लोकयुग, जनूभाऊ काणे यांचे समाचार, आचार्य गुंदेचा यांचे नवा मराठा, मुनोत यांचे नगर टाईम्स आदी. यांच्या व्यतिरिक्त प्रकाश भंडारे, गोपाळ मिरीकर, सुधीर मेहता, सतीश कुलकर्णी, सॉलोमन गायकवाड, अशोक झोटींग, कैलास ढोले, महादेव कुलकर्णी, सुभाष गुंदेचा, रामदास ढमाले, नंदकुमार सातपुते, नरहर कोरडे, सुहास देशपांडे, केडगावचे कुलकर्णी बंधु, सतीश डेरेकर, ‘दर्शक’चे रियाज शेख, सोपानराव दरंदले, ज्ञानेश्वर निमसे, विलास राजगुरू, राजू इनामदार, नरहर कोरडे, शिल्पा रसाळ, बाबा जाधव, दिपक मेढे, श्रीराम जोशी, राजेश सटाणकर, दादा हिरे, बाळ बोठे असे अनेक ज्येष्ठ संपादक व पत्रकार अहमदनगरमधे होऊन गेले आहेत काही अद्यापही कार्यरत आहेत. त्यांचे जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक तसेच पर्यावरण प्रगतीत योगदान विसरता न येणारे आहे. अहमदनगरमधे आकाशवाणी केंद्र सुरू झाल्यावर व्हाईस पत्रकारीतेत अनेकांनी कामे केली. सुरूवातीला गोपाळराव मिरीकर, अनिल पाटील अशा अनेकांनी आकाशवाणीमधे कामे केली तर नव्या पिढीच्या किरण डहाळे सारख्या तरूणांनी ‘नगरी-नगरी’ हे घटना व माहितीचे नवे दालनच खुले करून लोकांना बातम्या वेगळ्या स्टाईलने पोहोचवल्या.

अहमदनगरमधे बदललेल्या काळानुसार टीव्ही व विविध चॅनल सुरू झाल्यावर इलेक्ट्रॉनिक पत्रकारीता सुरू झाली. त्यात शहरात अष्टेकर यांचे स्थानिक केबल प्रसारण सुरू झाले. त्यावर शहरातील ज्या भागात केबल कनेक्शन आहे तेथील जनतेला बातम्या पुरविण्याचे काम इलेक्ट्रॉनिक मिडीयातील पत्रकार करू लागले. त्यामधे साईराम गारडे, राहूल विळदकर, इक्बाल शेख, मकरंद घोडके, विजय म्हस्के, यतीन कांबळे, रोहित वाळके, सुशिल थोरात, सय्यद उमेर, अफजल सय्यद अशी अनेकजण नव्या दमाची तरूण पत्रकार मंडळी काम करत होती, भ्रष्टाचारी व टुकार राजकारण्यांना ताळ्यावर आणत होती. अहमदनगर जिल्हा वस्तु संग्रहालयाच्यावतीने वा. द. कस्तुरे यांच्या नावाने पुरस्कार दिला जात होता, सध्या तो बंद आहे. देशव्यापी व राज्यव्यापी चॅनेलसाठी पराग चौकर, मनोज सातपुते सारखे सिनिअर टिव्ही जर्नालिस्ट काम करत होते. आजही इलेक्ट्रॉनिक मिडीयात नवी पिढी जोरदारपणे काम करत आहे.

ऐतिहासिक अहमदनगर शहर हे ‘दखनी संस्कृती’साठी जगभरात प्रसिद्ध आहे. येथील हिंदी उर्दू मिश्रीत भाषा हि ‘दखऩी हिंदी’ या नावाने जगभर प्रसिध्द आहे. उर्दूमधे प्रसिध्द होणारे आबिदखान दूलेखान यांचे ‘मखदूम’ हे उर्दू भाषिकांमधे लोकप्रिय आहे. येथील स्वातंत्र्यपुर्व काळापासून उर्दू पत्रकारीता सुरू आहे. तिच्याकडेही मनपाचे दूर्लक्ष झाले आहे. डिजीटल मिडीयामधे तेजस शेलार सारख्या तरूणांनी अहमदनगर लाईव्ह २४ सारखे ऑनलाईन बातमीपत्राची सुरूवात करून अण्णा हजारे यांच्या हस्ते याचे उदघाटन केलेले होते. आजही शहरात रयत समाचार’सारखे छोटे मोठे अनेक बातमी पोर्टल काम करत आहेत. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व पर्यावरण क्षेत्रातील अनेक घडामोडींवर अंकुश ठेवून पत्रकारीता करत आहेत. पत्रकारीतेचा अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे फोटो पत्रकारीता. फोटोग्राफर आला नसेल तर कार्यक्रमही सुरू होत नाही. असा महत्वाचा असलेला फोटो पत्रकाराकडेही मनपाचे दुर्लक्ष झालेले दिसत आहे.

जुन्या पिढीचे फोटो पत्रकार विनोद शहा, अनिल शहा, राजू शेख, देविप्रसाद अय्यंगार, दत्ता इंगळे, समिर मनियार, विजय मते, अरूण हातवळणे, राजू खरपुडे यासारखी अनेक मंडळी आहेत. ज्यांच्या एका फोटोने धमाल घडवुन आणली. वाजीद, साजीद शेख, महेश कांबळे, लहू दळवी, धनेश कटारीया, यासारखे नवेही अनेक फोटोपत्रकार आहेत. या सर्वांना न्याया दिला जावा. एकंदरीत महानगरपालिका आणि त्यांच्या रिमोट कंट्रोलने वैभवशाली अहमदनगरच्या पत्रकारीता ऐतिहासिक वारशावर अन्याय केलेला आहे. पत्रकारीता क्षेत्र फार मोठे व महत्वाचे असताना त्याला तीळाच्या दाण्याएवढे करून ठेवले आहे. महानगरपालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे आणि मनपा पदाधिकारी यांनी कोणाच्याही दबावाला न घाबरता नव्याने पत्रकारीतेच्या वारशाचा सन्मान करत सर्वसमावेशक पत्रकार पुरस्कार द्यावेत. दिवंगत महेंद्र कुलकर्णी यांचे नावे जाहीर केलेले पुरस्कार द्यावेतच पण त्याचबरोबर तातडीने बैठक घेऊन व्यापक पध्दतीने पत्रकारीतेतील सर्व प्रवाहांना न्याय देत नव्याने इतर पुरस्कार ठरवावेत व ते पत्रकार दिनी प्रदान करावेत.

आम्ही याबाबत काही पुरस्कारांची नावे सुचवित आहोत.
१) ‘ज्ञानोदय’चे संपादक, जागतिक किर्तीचे पर्यावरणतज्ज्ञ, शेतीतज्ज्ञ, पर्यावरण व पक्षीप्रेमी रेव्ह. सॅम्युअल बेकन फेअरबँक यांच्या नावाने पर्यावरणावर बातमीदारी करणार्‍या पत्रकारास ‘ज्ञानोदय’कार एस. बी. फेअरबँक पर्यावरण पत्रकारीता पुरस्कार’ या नावाने पुरस्कार द्यावा.
२) इलेक्ट्रॉनिक मिडीयातील प्रभावी बातमीदारी करणार्‍या पत्रकारास ज्येष्ठ टिव्ही जर्नालिस्ट ‘कै. पराग चौकर इलेक्ट्रॉनिक मिडीया पुरस्कार’ यांच्या नावाने पुरस्कार द्यावा.
३) सलग ५७ वर्षे प्रकाशित होत असलेल्या ‘दीनमित्र’ च्या नावाने सत्यशोधक, अंधश्रध्दानिर्मूलन विषयक बातमीदारी करणार्‍या पत्रकारास ‘दीनमित्र मुकूंदराव पाटील सत्यशोधक पत्रकार पुरस्कार’ द्यावा.
४) डिजीटल मिडीयातील प्रभावशाली न्यूज व इन्फर्मेशन पोर्टल आणि युट्यूब चॅनेलसाठी संपादकास ‘नवयुग पत्रकारीता पुरस्कार’ द्यावा.
५) रेडीओवरील व्हाईस बातमीदारी करणाऱ्या रेडीओ जर्नालिस्टला ‘अहमदनगर आवाज पुरस्कार’ द्यावा.
६) उर्दू पत्रकारीता करणार्‍या बातमीदारास ‘शहाशरीफ उर्दू पत्रकारीता पुरस्कार’ द्यावा.
७ ) फोटो पत्रकारीता करणाऱ्या पत्रकारास ‘प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे पुरस्कार’ द्यावा.
८) महिला पत्रकारास ‘सुलताना चांदबीबी धाडसी पत्रकार पुरस्कार’ द्यावा.
९) दलित, वंचित घटकांचे प्रश्न ऐरणीवर आणून सोडवणूक करणाऱ्या बातमीदारास ‘विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर युगप्रवर्तक पत्रकार पुरस्कार’ द्यावा.

महानगरपालिकेने आता गंभीर होऊन याविषयी तात्काळ कारवाई करणे अपेक्षित आहे. राजकीय दडपणात न येता आयुक्त साहेब डॉ. पंकज जावळे यांनी या विषयावर व्यापक बैठक घेऊन पुढील कारवाई सुरू करावी.

अहमदनगरच्या पत्रकारीतेच्या वारशाला स्मरून सर्व प्रवाहांना समान न्याय द्यावा. ‘आभाळाएवढे कार्य असलेल्या पत्रकारीतेला तिळाच्या दाण्याएवढे करून ठेवू नये.’ आम्ही सुचविलेले पुरस्कार येत्या पत्रकारदिनी दिले जावेत आणि ते कायमस्वरूपी सतत दिले जावेत. यासाठी तात्काळ बैठक घेऊन पुरस्कारांची निवड व घोषणा करून दि. ६ रोजी सन्मानपुर्वक वितरण करावे.

अन्याथा आम्हाला दि. ४ रोजी आपल्या कार्यालयामधे धरणे आंदोलन तर दि. ६ रोजीच्या अपुर्ण पुरस्कार वितरण कार्यक्रमात जाहीर निदर्शने करावी लागणार आहेत. तरी तात्काळ सकारात्मक निर्णय घेऊन पत्रकारीतेतील इतर प्रवाहातील पत्रकारांवरील अन्याय दूर करावा व पुढील कारवाई करावी. त्याबाबत अवगत करावे, असे समितीच्या वतीने आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button