खुद्द बाळासाहेब ठाकरेंनाच बदलायचे होत अहमदनगर जिल्ह्याचे नावं !

आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधानपरिषदेत “अहमदनगरचे अहिल्यानगर कधी होणार?” असा सवाल उपस्थित केला. ते म्हणाले, “पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं काम अखंड हिंदुस्थानामध्ये सगळ्यांना सर्वश्रुत आहे. हिंदू धर्माचं रक्षण असेल, मंदिराचा जीर्णोद्धार असेल, वेगवेगळ्या धर्मशाळा बांधण्याचा विषय असेल,
घाट बांधण्याचा विषय असेल काशी विश्वेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार, पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी केला. आणि आत्ता जेव्हा माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काशी विश्वेश्वराचा कॉरिडॉर निर्माण केला.
त्याचा लोकार्पण झाला फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि तिथं पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा पुतळा केंद्र सरकारच्या वतीनं बसवून अहिल्यादेवींच्या कामाची पोचपावती केंद्र सरकारनं दिलेली आहे
सुमारे वीस-बावीस वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नगरच्या सभेत बोलताना अंबिकानगर नावाची मागणी केली होती. मात्र नंतर शिवसेनाही या मागणीबाबत फार आग्रही राहिली नाही किंवा राज्यात शिवसेना सत्तेवर आली तरी या पक्षाने याबाबत काही हालचाल केली नाही,
निर्णय घेतला नाही. अलीकडच्या काळात धनगर आरक्षण प्रश्नावर लढे सुरू झाले. या लढय़ातून आरक्षणाच्या मागणीबरोबरच नगरचे नाव बदलून ते अहिल्यादेवी नगर करावे या मागणीचा समावेश करण्यात आला. माजी खासदार विकास महात्मे यांनी नागपूर येथील समाजाच्या मेळाव्यात ही मागणी केली होती.
आमदार पडळकर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून पुन्हा ही मागणी केली. या दरम्यानच्या काळात नगरमधील कोणताही पक्ष, संघटना, संस्था यांनी ही मागणी केली नव्हती किंवा पडळकर ज्या पक्षाचे आहेत त्या भाजपनेही ही मागणी कधी केली नाही.
उलट यासंदर्भात बोलताना भाजपचेच नगरमधील खासदार डॉ. सुजय विखे यांनी त्यावेळी काहीसे विरोधातच मत व्यक्त केले होते. अहमदनगरच्या नामांतराचा विषय आमच्या, पक्षाच्या कार्यक्रम पत्रिकेवर नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आमदार पडळकर या मागणीवर पक्षातही एकाकी असल्याचे दिसते.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे चोंडी हे जन्मगाव. हे गाव नगर जिल्ह्याच्या एका टोकाला आहे. या गावाचा तीर्थक्षेत्र, पर्यटनदृष्टय़ा विकास करण्याचा आराखडा गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आहे.
अहिल्यादेवींच्या यंदाच्या जयंती महोत्सवात, चोंडी गावात राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आमदार रोहित पवार विरुद्ध भाजप आमदार पडळकर यांच्यामध्ये संघर्ष उडाला होता.
त्यानंतर पडळकर यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून नामांतराची मागणी केली होती. मुळात नगर जिल्ह्यातील नागरिकांची फार पूर्वीपासून प्रमुख मागणी आहे ती जिल्हा विभाजनाची.
त्याचा कोणत्याही काळातील सत्ताधारी किंवा राजकीय नेते गांभीर्याने विचार करत नाहीत. तरीही नामांतराच्या संवेदनशील विषयात पडळकर यांनी हात घातला आहे.