अहमदनगरमध्ये बाटली व ड्रममध्ये पेट्रोल विक्रीवर बंदी; कारण…

नगर शहरात गेल्या काही दिवसांपासून जातीय तेढ निर्माण होईल या पद्धतीने कुरापती सुरू आहेत. डॉ. आंबेडकर जयंती दिनी अनुचित घटना घडली आहे. सोशल मीडियातून तणाव निर्माण होईल, असे मेसेस व्हायरल होत आहेत.
या सर्व पार्श्वभूमीवर आगामी सण उत्सवाच्या काळात समाजकंटकांकडून अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी अहमदनगर शहर पोलीस प्रशासन खबरदारी घेत आहे.
दरम्यान आगामी काळातील सण-उत्सव व शहरातील जातीय तणावाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पेट्रोल पंपावर बाटली, ड्रममध्ये पेट्रोल विकण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.
तोफखाना पोलिसांनी पंप चालकांची बैठक घेऊन सूचना दिल्या आहेत. तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पेट्रोल पंप चालकांची बैठक निरीक्षक ज्योती गडकरी यांनी घेतली.
पेट्रोल पंपावर बाटलीमध्ये अथवा ड्रममध्ये पेट्रोल व डिझेलची विक्री करू नये, पंपांवर सुरक्षा रक्षक नेमावेत, अशा सूचना पंप व्यवस्थापनाला दिल्या आहेत.
यावेळी तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 8 पैकी 6 पेट्रोल पंपाचे प्रतिनिधी उपस्थित होते. पेट्रोल पंप मालक, चालकांना सीआरपीसी 149 प्रमाणे नोटिसा देण्यात आल्याचे निरीक्षक गडकरी यांनी सांगितले.