बँकेतील अधिकाऱ्याचा नऊ लाखांवर डल्ला
याप्रकरणी बँकेच्या एका अधिकाऱ्याविरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर बँकेतील संगणकाच्या : अॅक्सेसचा गैरवापर करून बडोदा बँकेतील ग्राहकांच्या खात्यातील सव्वानऊ लाख रुपये अधिकाऱ्याने लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी बँकेच्या एका अधिकाऱ्याविरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पौखोचीन गुईटे (रा. पट्टा, चांदपूर, मणिपूर) असे गुन्हा दाखल झालेल्या बडोदा बँकेतील अधिकाऱ्याचे नाव आहे. याबाबत बँकेच्या माणिक चौक शाखेचे व्यवस्थापक दिलीप अनंतराव ढोबळे यांनी फिर्याद दिली आहे. आरोपीने बँकेतील संगणक अॅक्सेसचा वापर करून गैरव्यवहार केल्याची तक्रार बँकेला प्राप्त झाली होती.
या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी केली असता, डिसेंबर २०१२ ते एप्रिल २०२३ या काळात वरील आरोपीने खातेदार किसन कर्डिले (रा. जखणगाव, ता. नगर) यांच्या १ लाख ५० हजार, बाळू गणपत बोठे (रा. पारगाव, ता. नगर) यांच्या ५ लाख ३५ हजार,
सकीना बानू शेख यांच्या १ लाख ८० हजार (रा. नेप्तीरोड, ता. नगर) आणि अशोक गोविंद केदार यांच्या बँक खात्यातून ६५ हजार असे एकूण ९ लाख ३० हजार रुपये ओळखीच्या लोकांच्या खात्यावर ऑनलाईन जमा केले.
नंतर ते स्वतःच्या बँक खात्यात जमा करून अपहार केला आहे. सध्या तो बँकेच्या गुहाटी येथील शाखेत कार्यरत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.