बापरे! व्यवसायात भरभराट येण्यासाठी घातले 23 लाख; फसवणूक झाल्याचे लक्षात येताच…

अहमदनगर- आयुष्यातील अडचणी सोडविण्यासाठी व व्यवसायात भरभराटी आणण्यासाठी आध्यात्मिक ज्ञान असल्याचे अमिष दाखवून येथील एका व्यवसायिकाची 23 लाख 43 हजार 500 रूपयांची फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विजय तबाजी काळे (रा. कुरणरोड, संगमनेर), त्याचा भाचा महेश विश्वास मोरे (रा. पठार भाग, घारगाव, ता. संगमनेर), गुरू प्रभाकर ढवळु डंबाळी, गुरूमाऊली पारूबाई प्रभाकर डंबाळी (दोघे रा. साकरे ता. विक्रमगड, जि. पालघर) या चौघांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश पोपट लोंढे (वय 32 रा. गजानननगर, लोंढे मळा, केडगाव) असे फसवणुक झालेल्या व्यवसायिकाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
गणेश लोंढे यांचे केडगावमध्ये फर्निचरचे दुकान आहे. त्यांची व्यवसायानिमित्त सन 2015 मध्ये विजय तबाजी काळे व त्याचा भाचा महेश विश्वास मोरे याच्याशी ओळख झाली होती. त्या दोघांनीही गणेशला सांगीतले की, ‘आमच्याकडे आध्यात्मिक ज्ञान असुन आम्ही तुमच्या आयुष्यात भरभराट आणु शकतो, आम्ही आमचे गुरू व गुरू माऊली यांचेकडुन हे ज्ञान प्राप्त केले असुन त्या ज्ञानाच्या आधारे आम्ही तुमची प्रगती करून देवू शकतो’, असे सांगीतले होते. दरम्यान जुलै 2019 रोजी विजय काळे व महेश मोरे यांनी,‘तुमचा व्यवसाय हा व्यवस्थित चालावा या करिता तुम्हाला आमचे गुरू व गुरू माऊली यांना बोलावून घेवून तुमचा आयुष्यातील अडअडचणी सांगुन त्यावर उपाय करावा लागेल, त्यासाठी मोठा खर्च करावा लागेल,’ असे सांगीतले.
त्यामुळे गणेशने त्यांच्यावर विश्वास ठेवून गुरू व गुरूमाऊली यांना बोलावून घेण्यास सांगीतले. दरम्यान त्यासाठी विजय व महेश यांनी गणेश यांना पाच लाख 51 हजार रूपये खर्च सांगितला होता.
30 ऑगस्ट, 2019 रोजी विजय व महेश यांनी एक पुरूष व एक महिला गणेशच्या घरी आणली. त्यांची नावे गुरू प्रभाकर ढवळु डंबाळी, गुरूमाऊली पारूबाई प्रभाकर डंबाळी, असे सांगितले. चौघांनीही गणेशच्या घराची परिस्थिती पाहुन तुम्हाला जिवनात खुप अडचणी आहेत, त्या आम्ही सोडवु शकतो, परंतु त्या साठी तुम्हाला खर्च करून तुमची सुटका करून घ्यावी लागेल, असे सांगीतले होते. त्यांचेवर विश्वास ठेवुन गणेशने त्यांना वेळोवेळी 23 लाख 43 हजार रूपयांची रक्कम त्यांना दिली आहे.
दरम्यान 22 डिसेंबर, 2022 रोजी महेश मोरे, गुरू व गुरूमाऊली हे तिघेजण गणेशच्या घरी आले. त्यांना म्हणाले,‘तुम्ही मला अजून पाच लाख 51 हजार रूपये द्या, तुमची उरलेल्या सर्व अडीअडचणी संपवून टाकतो.’ त्यावेळी गणेश यांनी पैसे देण्यास असमर्थता दर्शवली व उलट तुम्ही माझे अगोदर दिलेले 23 लाख 43 हजार 500 रूपये मला पाठीमागे द्या, अशी मागणी केली. तेव्हा त्यांनी मला,‘तु जर पैसे दिले नाही तर तुमच्या कुटुंबाच नुकसान करून टाकू ’, अशी धमकी देवून निघून गेले. फसवणुक झाल्याचे गणेश यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी 27 डिसेंबर रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.