बापरे! वजन कमी करण्यासाठी तिने घातले 25 लाख; महिलेची अशी झाली फसवणुक

अहमदनगर- कोण कुठे कसं फसेल सांगता येत नाही. एका महिला वजन कमी करण्यासाठी औषध मागितल्याने फसली. औषध कंपनीने दाखविलेल्या आमिषाला भुल्याने औषधांच्या माध्यमातून 25 लाख 87 हजार 500 रूपयांची फसवणूक झाली आहे.
यासंदर्भात शहरातील बोल्हेगाव उपनगरात राहणार्या महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी यांनी वजन कमी करण्यासाठी 15 जानेवारी 2022 रोजी गुगलवर सर्च केले. त्यावेळेस इंडिया फिटनेस नावाची कंपनीची माहिती मिळाली. या कंपनीची साईट ओपन केल्यानंतर काही वेळाने काव्या नावाच्या तरूणीने मोबाईलवरून संपर्क साधला. वजन कमी करण्यासाठी 25 हजार रूपयांची औषधे खरेदी केल्यास निश्चित वजन कमी होईल, अशी खात्री दिली. तीन महिन्यात वजन कमी होईल, असे सांगितले. त्यानुसार बँक खात्यातून 25 हजार रूपये पाठविण्यात आले. कंपनीने कुरिअरने ही औषधे पाठवून दिली.
तीन महिने औषधे घेऊनही वजन कमी झाले नाही. त्यामुळे कंपनीशी संपर्क केल्यावर आणखी महाग औषधे घ्यावी लागतील, असे सांगण्यात आले. कंपनीच्या वतीने वेगवेगळ्या प्रतिनिधींनी संपर्क साधला. त्यानुसार आणखी पैसे पाठविण्यात आले. या औषधांचा कोणताही उपयोग होत नसल्याने पैशांची पुन्हा मागणी केल्यावर वेगवेगळी कारणे सांगून आणखी पैसे घेतले.
25 लाख 87 हजार 500 रूपये कंपनीच्या खात्यात आतापर्यंत पाठविण्यात आले आहेत. त्यानंतर कंपनीच्या प्रतिनिधींनी धमक्या देण्यास सुरूवात केली. त्यामुळे फसवणूक झाल्याची खात्री झाली, असल्याचे महिलेने म्हटले आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक नितिन रणदिवे पुढील तपास करीत आहेत.