बापरे! चुकीचा डोस दिल्याने 40 मेंढ्यांचा मृत्यू

अहमदनगर- चाळीस मेंढ्यांचा चुकीचे औषध दिल्याने मृत्यू झाल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथे घडली.
खंडाळ्यातील नेहरूवाडी भागात ढोकचौळे यांच्या शेतात राहुरी तालुक्यातील तीन मेंढपाळांची मेंढरं बसविण्यात आली आहेत. गेली काही दिवसांपासून ते त्याच परिसरात फिरून मेंढरे चारायला नेत आहेत. दररोज एक – दोन मेंढरं मृत्यूमुखी पडायला लागली म्हणून त्यांनी राहुरी येथील डॉक्टरांना पाचारण केले.
त्यांनी आजारी मेंढ्यांवर सलाईन, इंजेक्शनचे उपचार केले. इतर सर्व मेंढ्यांना राहुरी येथून त्यांच्या मेडिकल दुकानातून औषधे घेऊन या असे सांगितले. त्याप्रमाणे 11 हजारांची औषधे आणली. त्यांनी मेंढ्यांना औषधे पाजली. परंतु त्यातील काही मेंढ्या मृत्युमुखी पडल्या.
जांभळी (ता. राहाता) येथील शिवाजी मोहन होडगर यांच्या 15 मेंढ्या, किरण ज्ञानदेव गुलदगड (म्हैसगाव) यांच्या 16 मेंढ्या, सुरेश तुकाराम गर्धे ( चिंचाळे ) यांच्या 9 मेंढ्या अशा एकूण 40 मेंढ्या मृत्यू पावल्या.
ज्या काही अत्यवस्थ होत्या त्यांच्यावर श्रीरामपूर येथील सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. मच्छिंद्र कोते, फिरता पशुवैद्यकीय दवाखान्याचे डॉ.प्रकाश लहारे, श्रीरामपूर पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. विजय भिमटे, उक्कलगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे डॉ. संदीप वाजे यांनी केले. तीन मेंढ्यांचे शवविच्छेदन केले व औषधोपचाराबद्दल मार्गदर्शन केले.