बापरे! दारू पाजली नाही म्हणून तरूणावर चाकू, चॉपरने खूनी हल्ला

अहमदनगर- दारू पाजण्यास नकार दिल्याने चौघांनी बिगारी काम करणार्या तरूणावर खुनी हल्ला केला. महेश गोरख आठवले (वय 38, रा. रेल्वे कॉलनी, नगर) असे जखमी तरूणाचे नाव आहे. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी रविवारी कोतवाली पोलिसांना दिलेल्या जबाबावरून चौघांविरूध्द खुनी हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कायनेटिक चौकातील हॉटेल परिमलच्या आवारात शनिवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
विजय भनगडे (वय 25, रा. बोहरी चाळ, रेल्वे स्टेशन), संदीप राजापुरे (वय 26, रा. बोहरी चाळ), पिंटू माघाडे (वय 38, रा. डॉन बॉस्को), मनोज ठाकूर (वय 26, रा. महात्मा फुले वसाहत, संजयनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयीतांची नावे आहेत.
महेश आठवले हे शनिवारी कायनेटिक चौकातील हॉटेल परिमलमध्ये रात्री 10 वाजता जेवणासाठी गेले होते. त्यावेळेस त्यांच्या ओळखीचे विजय भनगडे, संदीप राजापुरे, पिंटू माघाडे, मनोज ठाकूर हे चौघे त्या ठिकाणी आले. या चौघांनी दारू पाजण्याचा आग्रह धरला.
आपल्याकडे पैसे नसल्याने दारू पाजू शकत नाही, असे महेश यांनी त्यांना सांगितले. त्यावर चौघे निघून गेले.
महेश हे हॉटेलमधून जेवण करून रात्री 11 वाजता बाहेर येताच चौघांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. विजय भनगडे याने चाकूने गळ्यावर वार केले. राजापुरे याने चॉपरने डोक्यावर वार केले.
पिंटू माघाडे आणि मनोज ठाकूर या दोघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही मारहाण होत असताना हॉटेलमधील कर्मचारी आणि ग्राहक मदतीसाठी बाहेर आले. त्यांनी उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी ही माहिती कोतवाली पोलिसांना दिली. पोलिसांनी घेतलेल्या जबाबानुसार चौघांविरूध्द खुनी हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे पुढील तपास करीत आहेत.