बापरे! प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीला केलं ब्लॅकमेलिंग

अहमदनगर- प्रियकराबरोबर अश्लिल फोटो काढून पतीला ब्लॅकमेलिंग केल्याचा प्रकार श्रीरामपूर शहरात घडला आहे. पतीने न्यायालयात धाव घेतल्यानंतर श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पतीला अंधारात ठेवून भाडेकरूशी संबंध प्रस्थापित करून पत्नीने स्वत:च प्रियकराबरोबर अश्लिल फोटो आणि व्हिडिओ तयार केला व पतीला ब्लॅकमेलिंग करण्याचा खळबळजनक प्रकार श्रीरामपुरात उघड झाला आहे. कोर्टाच्या आदेशान्वये पत्नी आणि प्रियकराविरुध्द श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पत्नीने गोड बोलून पतीची जागा स्वतःच्या नावावर करून घेतली. तसेच आपल्या जागेवर बंगला बांधला आणि बंगल्याच्या वरच्या मजल्यावर भाडेकरूंना राहण्याकरिता खोल्या काढल्या. 2019 ला नोकरीस असणारा एकजण भाडेकरू म्हणून आला. तो रात्री अपरात्री दारू पिऊन यायचा. परंतु त्याच्यापासून काही त्रास झाला नाही. नंतर तो फिर्यादीच्या पत्नीला पाणी विसरलो, तुमच्याकडील पाणी द्या, आज मेस बंद आहे, मला जेवण द्या, असे म्हणत त्याने फिर्यादीच्या पत्नीबरोबर जवळीक सुरू केली.
फिर्यादी कामाच्या निमित्ताने बाहेर गेल्यावर पत्नी आणि सदर भाडेकरू एकमेकांकडे जात असल्याचे मुलांना समजले. त्यानंतर पत्नीने मुलांना ड्रेस घेऊन देणे, आईस्क्रिम खाऊ घालणे, पिक्चर दाखवणे असे अमीष दाखवून पप्पांना काही सांगू नका, असे मुलांना शिकवले. त्यानंतर मुलांच्या बोलण्यातून दोघांमधील बाब समजल्याने पतीने पत्नीला विचारले असता तिने कायद्याच्या भाषेत बोलायला सुरूवात केली.
तेव्हा मी एक दिवस बाहेर चाललो असे सांगितले आणि दोघांना रंगेहाथ पकडले. त्यानंतर सदर भाडेकरुने तुझ्या बायकोचा आणि माझा विषय मला संपवायचा आहे, असे फोनवर म्हणाला. त्यानंतर फोन ठेवून आमच्यात काय झालं, हे मॅडमला विचारा असे म्हणू लागला. फिर्यादीस तुझ्या पत्नीचे व माझे नको त्या अवस्थेतील फोटो आणि क्लिप माझ्याकडे आहे, ते मी व्हायरल करील, तुझ्या मुलीशी कोणी लग्न करणार नाही, तुझे वाटोळे होईल असे धमकावले.
फोटो डिलीट कर, आमच्या संसारातून निघून जा, असे त्याला फिर्यादी म्हणाला असता त्याने 5 लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर त्याने फिर्यादीस मोबाईलवर एक फोटोही पाठवला. पत्नीनेही आपले वाटोळे होईल, त्याला पैसे देऊन टाका व विषय संपवा, असे फिर्यादीस म्हटल्याने आणि सदर भाडेकरुने नको त्या अवस्थेतील फोटो व व्हिडिओ क्लिप दाखवल्याने फिर्यादीने मुलांच्या शिक्षणाला जमवलेले पैसे व कर्जाचे आणलेले पैसे पत्नीच्या प्रियकराला आणि काही पत्नीच्या खात्यावर पाठवले.
पैसे दिल्यानंतर काही काळजी करू नका, आता काही होणार नाही आणि मीही आता काही करणार नाही, असे पत्नी सांगत होती, त्याचवेळी सदर भाडेकरुच्या सासर्याचा फोन आला व त्यांनी नगरला भेटायला बोलावले. त्यानंतर सदर फोनमधील डाटा पत्नीने स्वतःकडे घेतल्याचे त्यांनी सांगितले. त्यावरील फोन कॉल व रेकॉर्डींग पाहिले असता त्यात पत्नी आणि आरोपी भाडेकरू या दोघांनी पूर्वीपासूनच फिर्यादीस फसवण्याचा कट संगनमत करून एकमेकांनी राजीखुशीने आक्षेपार्ह अवस्थेतील फोटो काढून ते प्रसिद्ध करण्याची धमकी देऊन खंडणी वसूल करून विश्वासघात करून फसवणूक केली.
याशिवाय पत्नीला याबाबत विचारल्यानंतर माझे डोके दुखते, तब्बेत खराब आहे, सकाळी सांगते अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन पत्नी रात्रीतून घरातून सोन्याचे अडीच लाखांचे दागिने त्यात नेकलेस, चेन, अंगठ्या घेऊन सदर प्रियकर भाडेकरुकडे राहण्यास गेली.
याबाबतची फिर्याद पोलिसांनी न घेतल्याने पतीने कोर्टात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. श्रीरामपूरच्या कोर्टात फिर्याद दिल्यानंतर कोर्टाच्या आदेशान्वये शहर पोलीस ठाण्यात आरोपी विकास बाबासाहेब कंठाळे आणि फिर्यादीची पत्नी यांच्याविरोधात भादंवि कलम 34, 380, 384, 385, 406, 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक अहिरे करीत आहेत.