मारहाण करून दागिने लुटायचे; एलसीबीने तिघांना गेले जेरबंद

अहमदनगर- कारेगाव व अशोकनगर (ता. श्रीरामपूर) तसेच नगर तालुका येथील शेतावरील वस्तीवर जावुन घरात प्रवेश व गंभीर दुखापत करून जबरी चोरी करणारी सराईत आरोपींची आंतरजिल्हा टोळी नऊ लाख, 75 हजार रूपये किंमतीचे 11.5 तोळे (115 ग्रॅम) व एक चारचाकीसह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
4 नोव्हेंबर रोजी निखील बाळासाहेब वाघ (वय 22, रा. वाघवस्ती, कारेगाव) हे रात्रीचे जेवण करुन दरवाजा खिडक्या बंद करुन कुटूंबियासह झोपलेले असतांना अनोळखी चार इसमांनी फिर्यादीचे घराचे किचनचे दरवाजाची कडीकोंडा कटावणीच्या सहाय्याने तोडुन घरात प्रवेश करुन, चाकुचा धाक दाखवुन कटावणी व लाथाबुक्यांनी मारहाण करीत दोन लाख 71, हजाराचे दागिने तसेच जाताना सचिन अरुण जगताप याचे बंद घराचा दरवाजा तोडुन कपाटातील 10 हजार रु. रोख रक्कम असा एकुण दोन लाख 81 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल बळजबरीने चोरुन नेला आहे. सदर घटने बाबत श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात आरोपी विरुध्द जबरी चोरी, घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नमुद घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना सदर ना उघड गुन्हा उघडकिस आणणे करीता विशेष पथक नेमुन कारवाई करणे बाबत आदेश दिले होते. नमुद आदेशा प्रमाणे निरीक्षक कटके यांनी विशेष पथक स्थापन केले होते.
हे विशेेष पथक श्रीरामपूर, नेवासा परिसरात फिरुन आरोपींची माहिती घेत असतांना निरीक्षक कटके यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, काही संशयीत इसम तवेरा गाडीमधुन चोरीचे सोने विक्री करण्यासाठी औरंगाबादकडुन अहमदनगरकडे येणार आहेत. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने निरीक्षक कटके यांनी सदर बातमीतील संशयीत इसमाची खात्री करुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या. नमुद सुचना प्रमाणे स्थागुशा पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी खडका फाटा (ता. नेवासा) येथे जाऊन आजुबाजूला दबा धरुन, सापळा लावुन थांबलेले असतांना बातमीतील वर्णना प्रमाणे एक तवेरा गाडी येताना दिसली.
पथकाची खात्री होताच गाडीस आडवे होऊन थांबण्याचा इशारा केला असता संशयीतांनी वाहनाचा वेग कमी करताच वाहनामध्ये बसलेले इसमांनी तवेरा गाडीचा दरवाजा उघडुन पळुन जावु लागले. पथकाने त्यांचा पाठलाग केला परंतु ते मिळुन आले नाही. त्याचवेळी पथकातील इतर अंमलदारांनी थांबलेल्या वाहनातील तीन इसमांना जागीच पकडुन पोलीस असल्याची ओळख सांगुन त्यांना त्याचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची आर्यन ऊर्फ एरीयल ऊर्फ काळु कांतीलाल काळे (वय 26, रा. नवापुरवाडी, ता. गंगापुर, जिल्हा औरंगाबाद), विदेश नागदा भोसले (वय 19, रा. नवापुरवाडी, ता. गंगापुर, जिल्हा औरंगाबाद) व भोईट्या ऊर्फ डसल्या ऊर्फ आदित्य कांतीलाल काळे (वय 21, रा. मानगल्ली, नेवासा फाटा, ता. नेवासा) असे असल्याचे सांगितले.
त्यांचेकडे अहमदनगरमध्ये येण्याचे कारण विचारले असता सुरुवातीस ते उडवा उडवीची उत्तरे देवु लागले त्यावेळी ताब्यातील तवेरा गाडीची झडती घेता गाडीचे ड्राव्हरमध्ये एक कापडी पिशवी मिळुन आली त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सोन्याचे दागिने मिळाले. मिळुन आलेल्या दागिन्याबाबत अधिक विश्वासात घेवुन विचारपुस करता त्यांनी श्रीरामपुर व नगर तालुका परिसरात घरात घुसून मारहाण करुन चोरी केलेले सोने विक्री करण्यासाठी जात असल्याचे कबुल केले.