अहमदनगर

यात्रेतील पाळण्यात बसण्यावरून दोन गटात मारहाण; परस्पर विरोधी फिर्यादी दाखल

श्रीरामनवमी यात्रेतील पाळण्यात बसण्याच्या कारणावरून थत्ते मैदानावर तुफान हाणामारी झाली. यात 9 जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी देण्यात आल्या असून त्यावरून पोलिसांनी 25 ते 30 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हल्ल्यात जखमी झालेल्यांची नावे… :- या घटनेत रोहित भोसले (वय 22), सुनील डुक्रे (वय21), अमोल सावंत (वय 31), निखिल वाडेकर (वय 11), जिब्राईल काकर (वय 20), सोहेल सय्यद (वय 22), रहेमान सय्यद (वय 15), ओसामा शेख (वय 20), व फरदीन खान (वय 20) हे 9 जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी साखर कामगार रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी देण्यात आल्या आहेत.

पहिली फिर्याद:- ओसामा इम्रान शेख, (वय 20, धंदा चिकन दुकान, रा. दत्तनगर) याने फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, माझा मित्र अनिकेत गायकवाड याच्याबरोबर पाळण्यामध्ये बसण्याकरीता गेलो असता तिथे सलीम लुल्ला,

रोहीत भोसले, निखील संजय वाडेकर, सुनील मारूती डुक्रे, अमोल नागेश सावंत (सर्व रा. श्रीरामपूर) यांनी मला व गायकवाडला तसेच तेथे उभे असलेल्या सोहेल याकुब सय्यद, फरदीन लियाकत खान, रहेमान इमान पठाण,

जिब्राईल सलिम कक्कर यांना तुम्ही तिकीट काढलेले आहे का? असे विचारले. यावर आम्ही त्यांना समजावून सांगत असताना आम्ही पाळण्यात फुकट बसण्याचा प्रयत्न करत असल्याचा गैरसमज करून त्यांनी आम्हाला शिवीगाळ करून मारहाण केली. या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलिसांनी वरील इसमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दुसरी फिर्याद :- अमोल नागेश सावंत (वय 34, रा. वार्ड नं. 7, श्रीरामपूर) याने दिली आहे. त्यात म्हटले आहे की, थत्ते ग्राऊंड येथील रामनवमीचा पाळण्याचा ठेका राजेंद्र भोसले यांनी घेतला असून त्यांना सहआयोजक म्हणून नागेश किसनराव सावंत, सलिम जहागिरदार, सलिम झुला, रियाज पठाण, जोएफ जमादार (सर्व रा. श्रीरामपूर) हे काम करतात.

सदर ठिकाणी स्वयंसेवक म्हणून माझ्यासोबत निखील संजय वाडेकर, रोहीत भाऊसाहेब भोसले, सुनील मारूती डुक्रे व इतर स्वयंसेवक काम करतात. रात्री 11 च्या सुमारास सलिम झुला हे व मी पाळणा बंद करीत असताना तेथे 10-15 मुलं आले.

यामध्ये अनिकेत गायकवाड, ओसामा शेख (दोघे रा. दत्तनगर), तसेच साहील याकुब सय्यद, फरदिन खान, जिब्राईल कक्कर, रहेमान इम्रान पठाण (सर्व रा. वॉर्ड. नं. 2) हे सर्वजण पाळण्यामध्ये फुकट बसण्याचा प्रयत्न करीत होते.

तेव्हा मी व माझ्या सोबत असलेल्या स्वयंसेवक सहआयोजकांनी त्यांना विरोध करत पाळणा आता बंद झाला आहे, तुम्ही नंतर या, असे समजावून सांगत असताना त्यांनी आम्हाला मारहाण केली. असेे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून शहर पोलीसांनी वरील इसमांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button