जमलेले लग्न मोडल्याचा संशयावरून दोन गटात मारहाण; परस्पर विरोधी फिर्याद दाखल

संगमनेर तालुक्यातील राजापूर येथे मुलाचे जमलेले लग्न मोडण्याचा प्रयत्न करणार्यास जाब विचारण्यास गेलेल्या एकास बेदम मारहाण केल्याची घटना घडली.
याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर परस्पर विरोधी फिर्यादीवरून मुलाकडील 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मंदा भाऊसाहेब गडाख (रा. मुरावडे, ता. मुळशी, जि. पुणे) यांच्या मुलाचे लग्न जमले होते. मात्र युवराज मधुकर खतोडे (रा. राजापूर, ता. संगमनेर) याने लग्न मोडण्याचा प्रयत्न केला.
म्हणून फिर्यादी महिला व तिचा भाऊ लहानु शंकर काळे (रा. देवठाण) हे राजापूर येथे गेले. विचारणा करत असताना युवराज खतोडे, सोमनाथ मधुकर खतोडे, सुवर्णा सोमनाथ खतोडे, युवराज खतोडे याची पत्नी, सुजल सोमनाथ खतोडे, मधुकर बापुराव खतोडे, (सर्व रा. राजापूर, ता. संगमनेर) व जालिंदर दशरथ गडाख (रा. पारेगाव बुद्रुक, ता. संगमनेर) यांनी संगनमताने येऊन कार अडवून दगडफेक करून तिचे नुकसान केले.
तसेच फिर्यादीचा भाऊ लहानू शंकर काळे यास मारहाण केली. सदर फिर्यादीवरुन पोलिसांनी वरील सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दुसरी फिर्याद
परस्पर विरोधी फिर्यादीत युवराज मधुकर खतोडे याने म्हटले आहे की, भाऊसाहेब दशरख गडाख हे त्यांच्या मुलाचे जमलेले लग्न मोडण्याचा प्रयत्न करतो याचा संशय घेवून त्यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून कारमधून येऊन फिर्यादीच्या वडिलांना मारहाण करुन जखमी केले.
यामध्ये युवराज खतोडे, मधुकर खतोडे, शिवराज खतोडे, सुवर्णा खतोडे हे जखमी झाले असून त्यांच्यावर घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या फिर्यादीवरुन पोलिसांनी भाऊसाहेब गडाख, मंदा भाऊसाहेब गडाख, अनिकेत भाऊसाहेब गडाख, लहानु शंकर काळे, तुकाराम शंकर काळे, नवनाथ शंकर काळे, गोपीनाथ शंकर काळे (रा. देवठाण), दिपक अशोक कर्पे (रा. पिंपळगाव कोंझिरा), लहानु काळे याचा मुलगा, तुकाराम शंकर याचा मुलगा, नवनाथ शंकर याचा मुलगा, एकनाथ शंकर काळे याचा मुलगा व इतर तिन ते चार महिला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.