अहमदनगर जिल्ह्यात महिला सरपंचाच्या पतीला मारहाण ! पाच जणांविरुद्ध गुन्हा
गणेश गडकरी, पंकज सोनवणे व तीन अनोळखी इसम (नाव, पत्ता माहीत नाही) अशा एकूण पाच जणांविरोधात संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. ज्ञानेश्वर डुबे यांनी दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला.

संगमनेर तालुक्यातील पेमगिरी गावच्या महिला सरपंच द्वारका डुबे यांचे पती ज्ञानेश्वर पंढरीनाथ डुबे यांना रविवारी (दि. ३) संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास शहरातील भूमी अभिलेख कार्यालयासमोर पाच जणांनी बेदम मारहाण केली. यात डुबे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गणेश गडकरी, पंकज सोनवणे व तीन अनोळखी इसम (नाव, पत्ता माहीत नाही) अशा एकूण पाच जणांविरोधात संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. ज्ञानेश्वर डुबे यांनी दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला.
मारहाणीत चाकू आणि रॉडचा वापर करण्यात आला. डुबे यांच्या पाठीत, डोक्यात, उजव्या डोळ्याखाली आणि डाव्या हाताच्या मनगटावर मारहाण करण्यात आली. चाकूने डोक्यात मारले, असेही फिर्यादीत म्हटले आहे.
संगमनेर शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील माळी अधिक तपास करीत आहेत.
ग्रामस्थांनी घेतली अधिकाऱ्यांची भेट
सोनवणे आणि त्याच्या साथीदारांनी ज्ञानेश्वर डुबे यांच्यावर हल्ला केला. त्या संदर्भाने पेमगिरी येथील ग्रामस्थांनी संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांची भेट घेतली. डुबे यांच्यावर हल्ला प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्यांना त्वरित अटक व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.