रॉड, कोयते घेऊन दरोडा टाकण्यापूर्वीच टोळीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

अहमदनगर- खंडाळा (ता. नगर) शिवारात व्यक्ती चारचाकी गाडीसह घातक शस्त्रांसह दरोडा घालण्याच्या तयारीने संशयितरित्या फिरत असल्याची माहिती तालुका पोलीसांना मिळाली. त्यानूसार पोलीसांनी पाठलाग करून गाडी आणि गाडीतील व्यक्तींना ताब्यात घेतले असता दरोड्याच्या तयारीत असणारी टोळी आणि घातक हत्यारांसह पाच लाखांचा मुद्देमाल पोलीसांच्या हाती लागला.
खंडाळा गावाच्या परिसरात पहाटेच्या वेळी पाच संशयित व्यक्ती हायवेच्या दिशेने पळतांना दिसले. त्यापैकी चार व्यक्ती हायवेलगत लावलेल्या एका करड्या रंगाचा क्रुझर गाडी एमएच 20, 3468 मध्ये बसले व एक इसम हा अंधाराचा फायदा घेऊन पळून जातांना दिसला. ही क्रुझर गाडीही नगरच्या दिशेने पळून जात असतांना पोलीस आणि खंडाळा गावचे विकास लोटके व इतर ग्रामस्थ यांच्या मदतीने त्यांचा पाठलाग केला. दरम्यान सदरची क्रुझर गाडी ही पुणे हायवेवरील केडगाव बायपास चौकात पहाटे 3 च्या सुमारास थांबविली दिसली. त्यावेळी जवळ जाऊन गाडीतील व्यक्तींना ताब्यात नाव विचारे असता सिकंदरसिंग ज्युनि, वय 38, जितेंद्रसिंग टाक, वय 30, दलसिंग टाक, वय 19, तिघे राहणार आलाना, गेवराई, (औरंगाबाद), शाह अन्सार शाह, वय 21, रा. चितेगाव, ता. पैठण, असल्याचे सांगितले.
त्यांच्याकडे पळून गेलेल्या पाचव्या व्यक्तीचे नाव विचारले असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यांच्या गाडीची झडती घेतली असता विविध प्रकारचे लोखंडी पान्हे, लोखंडी रॉड, कोयते, स्क्रुड्रायव्हर, रस्सी, लोखंडी साखळी, बिळा, लोखंडी पाईप, लोखंडी हुक पाईप, असा 5 लाख 12 हजार 800 किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. आरोपी विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी सिकंदरसिंग शक्तीसिंग ज्युनि याच्या विरोधात औरंगाबाद जिल्ह्यात चार तर जितेंद्रसिंग संतोषसिंग टाक यावर 11 गुन्हे दाखल असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी दिली.