सावधान! नगरमध्ये हेल्मेट गँग सक्रीय; सहज ओरबडतात महिलांच्या गळ्यातील दागिने

अहमदनगर- तोंडावर मास्क व डोक्यात हेल्मेट घालून आलेल्या चोरट्यांनी नगर शहरात धुमाकूळ घातला आहे. दोन ठिकाणी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबडले. तोफखाना व कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत या घटना घडल्या आहेत. महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणारी हेल्मेट गँग सक्रिय झाल्याने पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.
बुधवारी सकाळी पावणे दहा वाजेच्या सुमारास लता मच्छिंद्र तुपे (वय 70 रा. तुळजाभवानीनगर, एकविरा चौक, पाईपलाइन रोड, सावेडी) या सिटी प्राईड हॉटेलजवळून जात असताना दुचाकीवरून आलेले आणि डोक्यात हेल्मेट घातलेले व तोंडाला मास्क असलेल्या दोन चोरट्यांनी लता तुपे यांना,‘येथे किराणा दुकान कुठे आहे’, असे विचारले. ‘मला माहिती नाही, मी येथे राहत नाही’, असे तुपे यांनी सांगताच ते पुढे जाऊन पुन्हा मागे आले व त्यांनी तुपे यांच्या गळ्यातील 12.5 तोळ्याची सोन्याची चैन ओरबडून धूम ठोकली. या प्रकरणी तुपे यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आगरकर मळा परिसरात बुधवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास एका वृध्द महिलेच्या गळ्यातील 13 ग्रॅमची सोन्याची चैन ओरबडून नेली. त्या चोरट्यांनी तोंडावर मास्क घातले होते. या प्रकरणी अनिल बाबुलाल कटारिया (वय 55 रा. आगरकर मळा, स्टेशन रोड) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिल कटारिया यांचे शांती डिपार्टमेंट अॅण्ड जनरल स्टोअर्स या नावाचे दुकान आहे. त्यांनी बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे दुकान सुरू केले होते. त्यांची आई शांताबाई कटारिया या दुकानासमोरील ओट्यावर खुर्चीवर बसलेल्या होत्या. दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने शांताबाई यांच्याकडे पाणी बाटली मागितली असता त्या पाणी बाटली देण्यासाठी उठताच त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन ओरबडली. दुसरा चोरटा दुचाकीवर बसलेला होता. ते दोघेही दुचाकीवर बसून सुसाट निघून गेले. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास स्थानिक गुन्हे शाखेसह शहर पोलिसांनी सुरू केला आहे.