अहमदनगर

सावधान! स्वस्तात सिमेंट व स्टील मिळवून देण्याच्या आमिषाने होऊ शकते तुमचीही फसवणूक

अहमदनगर- बांधकाम करण्यासाठी कमी किंमतीत सिमेंट व स्टील मिळवून देतो, असे कोणी सांगितलं तर त्यापासून तुमची फसवणूक होऊ शकते. कारण नगर जिल्ह्यातील कोपरगावसह राहाता तालुक्यातील अनेकांना कमी किंमतीत सिमेंट व स्टील मिळवून देतो, असे आमिष दाखवून लाखो रुपयांना अनेकांना गंडा घातला गेल्याचा प्रकार समोर आला आहे.

 

गंडा घालणारा शिवानंद कुंभार याचा मुख्य एजंट बाबासाहेब मच्छिंद्र गोसावी, रा. जेऊर कुंभारी, ता. कोपरगाव याच्यावर कोपरगाव येथील गणेश दादासाहेब जामदार व जेऊर कुंभार येथील वीरेंद्र सतीश शिंदे यांनी कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. मात्र तेव्हापासून बाबासाहेब गोसावी हा पसार होता. त्याला कोपरगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

 

कोपरगाव येथील गणेश दादासाहेब जामदार यांनी कोपरगाव पोलीस ठाण्यामध्ये सुमारे दोन अडीच वर्षांपूर्वी फिर्याद दाखल केली होती. फिर्यादीत म्हटले आहे, माझी जैऊर कुंभार येथील बाबासाहेब मच्छिंद्र गोसावी याची ओळख झाल्यानंतर व त्यावेळी माझे घराचे बांधकाम सुरू असल्यामुळे बाबासाहेब गोसावी यांनी तुम्हाला स्वस्तात स्टील, सिमेंट देतो.

 

माझ्याकडे त्यासाठी एक स्कीम आहे. तुम्हाला 60 टक्के रक्कम द्यावी लागेल. मी बाबासाहेब गोसावी याला वीरेंद्र सतीश शिंदे यांच्या समक्ष दोन लाख 8 हजार रुपये रोख दिले. त्यानंतर गोसावी याने या स्कीमचा मुख्य लीडर शिवानंद दादू कुंभार, रा. इचलकरंजी, जिल्हा कोल्हापूर हा असून त्याला आणखी काही रक्कम अकाउंटवर पाठवावी लागेल.

 

त्यानुसार मी अकाउंट नंबर मागितले व 16 डिसेंबर 19 ला संन्मती कुंभार यांच्या पंजाब नॅशनल बँक अकाउंटवर एक लाख 54 हजार रुपये पाठवले तसेच संदीप अशोक यादव यांच्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या अकाऊंटवर एक लाख 54 हजार पाठवले. असे एकूण पाच लाख 16 हजार रुपये मी गोसावी यास मित्र वीरेंद्र सतीश शिंदे यांच्या समक्ष दिले.

 

त्याचप्रमाणे वीरेंद्र सतीश शिंदे यांनीही स्टील सिमेंटसाठी जेऊर कुंभारी विविध कार्यकारी सोसायटीचे पत्नीच्या नावावर तीन लाख दहा हजार रुपये कर्ज काढून बाबासाहेब गोसावी यास रोख दिले व तीन लाख 59 हजार रुपये पाठवले. असे एकूण सहा लाख 79 हजार रुपये वीरेंद्र शिंदे यांनी माझ्या समक्ष बाबासाहेब गोसावी यांना दिले. असे एकूण 11 लाख 95 हजार रुपये आम्ही दोघांनी बाबासाहेब गोसावी यांना दिले होते. मात्र बाबासाहेब गोसावी यांनी सिमेंट स्टील दिलेच नाही. आज स्टील सिमेंट ची गाडी आली नाही. उद्या, परवा गाडी येईल. असे तो सतत सांगून उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागला.

 

नंतर या स्कीमचा मुख्य लीडर शिवानंद दादू कुंभार हा कुठेतरी गेला आहे. असे सांगू लागला. त्यानंतर आमची खात्री झाली की बाबासाहेब गोसावी याने आपली फसवणूक केली आहे. त्यानंतर कोपरगाव पोलीस ठाण्यात बाबासाहेब मच्छिंद्र गोसावी यांच्या विरोधात फिर्याद दाखल करण्यात आली.

 

या फिर्यादीनुसार कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 211/22 भादंवी कलम 420/406 यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता. तद्नंतर 16 डिसेंबर 19 ते 7/7 /22 या कालावधीत बाबासाहेब मच्छिंद्र गोसावी हा पोलिसांना मिळून येत नव्हता. मात्र कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी बाबासाहेब मच्छिंद्र गोसावी यास अटक केली असून त्याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान अशी राज्यामध्ये कोट्यावधीची फसवणूक करणारा शिवानंद दादू कुंभार यालाही पोलिसांनी अटक केली आहे.

 

या कोट्यावधी घोटाळ्याची पाळेमुळे कोपरगाव व राहाताच नव्हे तर संपूर्ण राज्यातील कानाकोपर्‍यात विखुरलेले असल्याचे दिसून येते. बाबासाहेब गोसावी याने पैशाच्या लोभापाई आपल्या अनेक नातेवाईकांना असे स्कीमचे आमिष दाखवून लाखो रुपयांना फसवले आहे. या सर्व प्रकरणाचा तपास कोपरगावचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button