
शेतकऱ्यांच्या कृषी पंपावर डल्ला मारून हे चोरलेले पंप भंगारात विकुन मालामाल होणारी चार जणांची टोळी कर्जत पोलिसांनी जेरबंद केली आहे.
यात दोन विधी संघर्षित (अल्पवयीन) बालकांचाही समावेश असुन कृषिपंप भंगारात विकत घेणाऱ्या एका भंगारवाल्यावर देखिल गुन्हा दाखल करून त्यालाही अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, कर्जत तालुक्यातील राशिन येथील साईराज मोटार रिवायडिंग या दुकानाच्या पाठीमागील उघड्या असलेल्या
गोडावुनमधुन वेगवेगळ्या कंपनीच्या (जुन्या वापरात असलेल्या) पाणबुड्या व इलेक्ट्रिक मोटारी दोन विधीसंघर्षित बालक आणि अजय आप्पा पानसरे आदींनी चोरून त्या इबारत मुस्तकीम शेख (रा.भिगवण ता.इंदापुर) या भंगार व्यावसायीकास विक्री केल्या.
याबाबत राहुल आबासाहेब जांभळकर यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असुन, यातील अजय आप्पा पानसरे व इबारत मुस्तकीम शेख याच्यासह त्याचे साथीदार असलेल्या दोन अल्पवयीन मुलांनाही अटक केली असून
त्यांच्याकडून ६० हजार किंमतीचे कृषी पंप जप्त करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.