बिग मी इंडिया घोटाळा; सहा संचालकांचे अटकपूर्व फेटाळले

गुंतवणूकदारांना जादा परतावा देण्याच्या आमिषाने बिग मी इंडिया प्रा. लि. कंपनीने कोट्यावधी रूपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी दाखल गुन्ह्यातील कंपनीच्या सहा संचालकांचे अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने नामंजूर केले आहेत.
अटकपूर्व जामीन नामंजूर केल्यामध्ये सोनिया राऊत, वंदना पालवे, सुप्रिया आरेकर, प्रितम शिंदे, प्रिती शिंदे, सॉल्यमन गायकवाड यांच्या समावेश आहे. मुख्य सूत्रधार सोमनाथ एकनाथ राऊत (मुळ रा. पाथरवाला ता. नेवासा, हल्ली रा. पाईपलाईन रोड, सावेडी) याला यापूर्वीच अटक केली आहे.
दरम्यान या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. या शाखेला सोमवारी कंपनीच्या विरोधात आणखी 170 नवीन पुरावे सादर करण्यात आले आहे, अशी माहिती फिर्यादी सतीश बाबूराव खोडवे (रा. कागल, जि. कोल्हापूर) यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सतीश खोडवे यांनी आर्थिक गुन्हा शाखेकडे बिग मी इंडिया कंपनीच्या विरोधातील 170 वेगवेगळे पुरावे सादर केले आहेत. यामध्ये टी. व्ही. वरील जाहिराती, रेडिओ वरील जाहिराती, सोशल मीडियावरील जाहिराती यांच्या माध्यमातून गुंतवणूकचे मोठ्या परताव्याचे आमिष दाखवत होते.
सोबत कंपनीचे माहितीपत्रामध्ये 107 कोटींची उलाढाल असल्याचे माहिती पत्रक, भारत सरकारच्या रजिस्टर कंपनी (आर.ओ.सी.) कंपनीची नोंदणी असल्याचे प्रमाणपत्र, आय. सी. आय.सी. बँकेचा डिस्काउंट व डिबेट कार्डचा वाटप, कॅर्पोरेट कंपन्याचा वापर, वेगवेगळ्या नावाने रजिस्टर असणार्या नऊ कंपन्या यांच्या माध्यमातून गुंतवणूक दाराकडून स्वीकारलेली रक्कमा,
पतसंस्थांना वाटप केलेले क्यू. आर. कोड, कंपनीचे व्यवसाय संबंधीचे डिजिटल वॉलेट चालवणारे आसाम, दिल्ली, उत्तरप्रदेश यांचे सोबत असणारे आरोपीचे संबंध, आरोपीने कंपनीच्या खात्यावर गुंतवणूकदारांची स्वीकारलेली रक्कम, डिजिटल वॉलवॅटचा वापर करून सर्व रक्कम लपण्यासाठी वापरलेले मार्ग, असे सर्व आरोपीच्या विरोधात सर्व पुरावे आर्थिक गुन्हा शाखेला सादर केले आहे.
या प्रसंगी उदय जोशीलकर, अशोक विघ्ने, संदीप पाटील आदी उपस्थित होते. दरम्यान महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण कायद्याअंतर्गत संचालकांची मालमत्ता जप्त करण्याची तरतूद आहे. बिग मी इंडिया कंपनीचा मुख्य सूत्रधार सोमनाथ, त्याची पत्नी सोनिया आणि इतर संचालकांच्या मालमत्ता जप्त करण्याची मागणी ठेवीदारांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना भेटून केली आहे.