अहमदनगर

मोठी बातमी; जरे हत्याकांडप्रकरणी बोठेसह सहा आरोपींना….

अहमदनगर- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे खून प्रकरणी मुख्य सूत्रधार बाळ बोठेसह सहा जणांना बुधवारी जिल्हा न्यायालयात दोषनिश्‍चितीसाठी आणले होते. आता खटल्याप्रकरणी नियमित सुनावणी 6 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. यावेळी सर्व आरोपींना हजर ठेवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

 

दरम्यान बुधवारी बोठेसह इतर दोघांचे विविध अर्ज न्यायालयासमोर आल्यामुळे दोषनिश्‍चिती झाली नाही. सर्व अर्जांवर आता 6 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.

 

30 नोव्हेंबर, 2020 रोजी जरे यांची नगर-पुणे महामार्गावर गळा चिरून हत्या करण्यात आली होती. बाळ बोठे हा या खुनाचा मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात समोर आल्यानंतर बोठेसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

बोठे याच्यावतीने न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. तपासादरम्यान जप्त करण्यात आलेला मोबाईल, दुचाकी मिळावेत व बँकेतील खात्यांवर व्यवहार सुरू करण्याबाबत परवानगीसाठी न्यायालयाकडे मागणी करण्यात आली होती. यावर बोठे याच्या वतीने अ‍ॅड. महेश तवले यांनी बाजू मांडली.

 

तर सागर भिंगारदिवे याने 15 दिवसांच्या जामीनाची मागणी केली होती. त्याच्या वतीने अ‍ॅड. रोमान सय्यद यांनी बाजू मांडली. आदित्य चोळके याच्याकडूनही अर्ज करण्यात आला होता. या सर्व अर्जांवर सुनावणी झाली. मयत जरे यांचा मुलगा रूणाल जरे यांच्या वतीने अ‍ॅड. सचिन पटेकर यांनी बाजू मांडत आरोपींच्या जामिनाला विरोध दर्शवला. विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव यांच्या वतीने त्यांचे सहकारी अ‍ॅड. जोशी यांनी बाजू मांडली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button